मुंबई : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे पदावरुन पायउतार झाले आहेत. पद सोडताना कुंबळेंनी कर्णधार विराट कोहलीच्या वर्तनावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. टीम इंडियाच्या कर्णधाराला माझ्या प्रशिक्षकपदावर आक्षेप असल्याचा आरोप त्यांनी पायउतार होताना केला आहे.

अनिल कुंबळे यांनी कार्यकाळ वाढवून घेण्यास नकार दिला. त्यानंतर राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. राजीनामा देताना त्यांनी खुलं पत्र लिहिलं आहे.

काय आहे कुंबळेंचं पत्र?

मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवण्याबाबत मला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा अभिमान वाटला.


गेल्या एक वर्षात संघाने जी कामगिरी केली आहे,


त्याचं श्रेय कर्णधार, संघ, प्रशिक्षक आणि सर्व सपोर्टिंग स्टाफला जातं.


मात्र माझी काम करण्याची शैली आणि कार्यकाळ वाढवण्याबाबत कर्णधाराला आक्षेप असल्याचं बीसीसीआयकडून कळवण्यात आलं.


कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यातील मर्यादांचा मी नेहमी आदर केला असताना हे ऐकून मलाही आश्चर्य वाटलं.


कर्णधार आणि माझ्यातील गैरसमज दूर करण्याचा बीसीसीआयने प्रयत्नही केला.


मात्र त्यातून काहीही तोडगा निघाला नाही.


त्यामुळे पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय मी घेतला.


व्यवसायिकपणा, शिस्त, वचन, प्रामाणिकपणा, पूरक कौशल्य आणि अपेक्षित दृष्टीकोन हे माझ्या कामाचं सूत्र होतं.


चांगल्या कामगिरीसाठी या गोष्टी आवश्यकच आहेत.


प्रशिक्षकाची जबाबदारी ही समोर आरसा धरून उभा राहणाऱ्यासारखी असते.


संघाला पाहिजे, तसा बदल प्रशिक्षकाने करायचा असतो, हे मी देखील पाहिलेलं आहे.


हे सर्व पाहता या जबाबदारीतून मुक्त होण्याचा मार्ग मी निवडला.


गेल्या एक वर्षापासून मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करताना आनंद वाटला.


त्यासाठी क्रिकेट सल्लागार समिती, बीसीसीआय आणि क्रिकेट प्रशासनाचे आभार मानतो.


भारतीय क्रिकेटच्या असंख्य चाहत्यांनाही मी धन्यवाद देऊ इच्छितो.


भारतीय क्रिकेटचा मी नेहमी हितचिंतक राहिन.


https://twitter.com/anilkumble1074/status/877218428318351361