लंडन : लंडनच्या ओव्हल मैदानात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात कर्णधार विराट कोहलीचं एका खास कारणाने कौतुक होत आहे. हे कौतुक त्याच्या 82 धावांच्या खेळीमुळे किंवा नेतृत्त्व कौशल्यामुळे नाही तर त्याच्या खिलाडूवृत्तीमुळे होत आहे.

नेमकं काय घडलं?
भारतीय डावादरम्यान काही भारतीय प्रेक्षक सीमेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथला चिडवत होते. त्यावेळी विराट कोहली मैदानात होता. त्याने हा प्रसंग पाहिला आणि तिथून प्रेक्षकांना इशारा करुन टाळ्या वाजवून स्मिथला चीअर करण्यास सांगितलं. यानंतर प्रेक्षक शांत झाले.

परंतु दुसऱ्या डाव्यात फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या स्मिथला पाहून भारतीय प्रेक्षकांनी पुन्हा 'चीटर, चीटर' म्हणण्यास सुरुवात केली होती.

खुद्द आयसीसीनेही हा व्हिडीओ ट्वीट करुन विराट कोहलीची प्रशंसा केली आहे.


स्मिथकडून आभार
विराट कोहलीच्या या कृत्यामुळे स्टीव्ह स्मिथला भरुन आलं. पीचजवळ येत त्याने कोहलीची पाठ थोपटून त्याच्या खिलाडूवृत्तीसाठी आभार मानले. यानंतर पत्रकार परिषदेत कोहलीने प्रेक्षकांच्या वतीने स्मिथची माफीही मागितली. कोहलीच्या या शालीनतेचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

इंग्लंडमध्ये स्टीव्ह स्मिथसोबत असा प्रसंगा घडण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी वेस्ट इंडिज विरुद्धच्या सराव सामन्यात अर्धशतक केल्यानंतर बॅट उंचावल्यानंतरही प्रेक्षकांनी त्याला चिडवलं होतं.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचं बॉल टॅम्परिंग
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर कॅमरुन बॅनक्रॉफ्टने मागील वर्षी केपटाऊन कसोटीत सॅण्डपेपरचा वापर करुन चेंडूसोबत छेडछाड केली होती, तसाच प्रकार झॅम्पाने केल्याचं नेटकऱ्यांचं मत आहे. मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंगप्रकरणी बॅनक्रॉफ्ट, डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव स्मिथ दोषी सिद्ध झाले होते. यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यावर प्रत्येकी एक वर्षाची तर बेनक्राफ्टवर नऊ महिन्यांदी बंदी घालण्यात आली होती. स्मिथ आणि वॉर्नरने 2019 आयपीएलमध्ये पुनरागमन केलं. यानंतर विश्वचषक 2019 मध्ये हे दोघे ऑस्ट्रेलियान संघात परतले.

भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी मात करुन, इंग्लंडमधल्या विश्वचषकात सलग दुसरा विजय साजरा केला. ओव्हलवरच्या या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 353 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 50 षटकांत सर्व बाद 316 धावांचीच मजल मारता आली. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराने प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडलं. लेग स्पिनर यजुवेंद्र चहलने दोन विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि अॅलेक्स कॅरीने अर्धशतकं झळकावली. पण तरीही ऑस्ट्रेलिया संघ विजयापासून 36 धावांनी दूर राहिला.