लीड्स : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर पाकिस्तानने विश्वचषकात विजय साकार केला. अफगाणिस्तानची कडवी झुंज मोडून काढत पाकिस्तानने सामन्यात बाजी मारली.


लीड्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानवर तीन विकेट्सने मात केली. 228 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला अखेरच्या षटकात विजयासाठी सहा धावांची गरज होती.

इमाद वासिम (49) आणि वहाब रियाज जोडीने या धावा पूर्ण करत पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विजयासह पाकिस्तानचं या स्पर्धेतलं आव्हान अजूनही कायम आहे.

त्याआधी, या सामन्यात पाकिस्ताननं अफगाणिस्तानला 50 षटकांत नऊ बाद 227 धावांत रोखलं. पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीनं 47 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडलं.

अनुभवी डावखुरा वेगवान गोलंदाज वहाब रियाझनं 29 धावांत दोन, तर डावखुरा स्पिनर इमाद वासिमनं 49 धावांत दोन विकेट्स काढल्या. लेग स्पिनर शादाब खानला 44 धावांत एक विकेट मिळाली. अफगाणिस्तानकडून असगर अफगाण आणि नजिबुल्लाह झादरान यांनी प्रत्येकी 42 धावांची सर्वोत्तम खेळी केली.

दरम्यान हा सामना सुरु होण्याआधी अफगाणी फॅन्सनी सुरक्षारक्षक आणि पाकिस्तानी चाहत्यांना हाणामारी केली. चाहत्यांच्या हाणामारीचा हा व्हिडीओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानचे चाहते तिकीट नसल्यानं स्टेडियममध्ये घुसघोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी मैदानावरच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखलं असता या चाहत्यांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. त्याचवेळी तिथे असलेल्या पाकिस्तानी प्रेक्षकांनाही अफगाणी चाहत्यांनी मारहाण केल्याचं समोर आलं आहे.