मॅन्चेस्टर : विश्वचषकाच्या रणांगणात टीम इंडियाचा सामना आज जेसन होल्डरच्या वेस्ट इंडिजशी होत आहे. पहिल्या पाच सामन्यात अपराजित असलेल्या भारतीय संघाने उपांत्य फेरीच्या शर्यतीत आपलं स्थान कायम राखलं आहे. विश्वचषकाच्या गुणतालिकेत भारत तिसऱ्या स्थानावर असून, भारताच्या खात्यात चार विजय आणि एका रद्द सामन्याचे मिळून नऊ गुण आहेत. आता विंडीजविरुद्धचा सामना जिंकला की, टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं तिकीट पक्कं म्हणायचं.

वेस्ट इंडिज...

1970 आणि 80 च्या दशकात प्रतिस्पर्ध्यांच्या मनात धडकी भरवणारा...

1975 आणि 1979 च्या विश्वचषकांत निर्विवाद वर्चस्व गाजवलेला...

क्लाईव्ह लॉईड, व्हीव रिचर्ड्ससारख्या दिग्गजांचा वारसा चालवणारा हा संघ...

यंदाच्या विश्वचषकात याच वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा धुव्वा उडवून दणदणीत सलामी दिली होती. पण हा विंडीज संघाला हा दरारा पुढच्या सामन्यांमध्ये राखता आला नाही. त्यामुळे उपांत्य फेरी गाठण्याच्या विंडीजच्या आशा जवळपास संपल्यात जमा आहेत.

याच विंडीज संघाची गाठ आता पडणार आहे ती विराट कोहलीच्या टीम इंडियाशी. मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर भारत आणि वेस्ट इंडिज संघांमध्ये विश्वचषकाचा हा साखळी सामना रंगणार आहे.

टीम इंडियाने विश्वचषकातल्या पाचपैकी चार लढतीत विजय मिळवला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. तर दुसरीकडे विंडीजला सहापैकी एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या टीम इंडियाची बाजू वरचढ दिसत असली तरी भारतीय संघाला धोका आहे.

आणि हा धोका कोणापासून आहे...

नंबर एक - ख्रिस गेल

जगातला सर्वात स्फोटक फलंदाज अशी गेलची ख्याती आहे. त्याच्या खात्यात वन डेत दहा हजाराहून अधिक धावा जमा आहेत. गेलची बॅट एकदा तळपली कि गोलंदाजाची लाईन अँड लेन्थ बिघडलीच म्हणून समजा.

नंबर दोन - शाय होप

विंडीज संघाच्या यष्टिरक्षणाची धुरा यशस्वीरित्या पेलणाऱ्या या युवा शिलेदाराचं फलंदाजीतलं सातत्य कमालीचं आहे. वन डेत त्याची सरासरी 50 पेक्षा जास्त आहे. शाय होपने आतापर्यंत 55 वन डेत सहा शतकं आणि दहा अर्धशतकांसह 2258 धावा फटकावल्या आहेत

नंबर तीन - शिमरॉन हेटमायर

गयानाच्या अवघ्या 22 वर्षांच्या पठ्ठ्यानं विंडीज संघात आपलं स्थान पक्कं केलं आहे. नेहमी ट्वेन्टी 20च्या शैलीत खेळणाऱ्या हेटमायरमध्ये सामना एकहाती फिरवण्याची क्षमता आहे. त्यामुळे गेल आणि होपप्रमाणे हेटमायरही टीम इंडियासाठी धोकादायक ठरु शकतो.

नंबर चार - कार्लोस ब्रेथवेट

बेन स्टोक्सला सलग चार षटकार ठोकून विंडीजला 2016 चा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक जिंकून देणारा बार्बाडोसचा हा वीर तुम्हाला नक्कीच आठवत असेल. याच कार्लोस ब्रेथवेटने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शतक ठोकून विंडीजचा विजय जवळपास निश्चित केला होता. पण सहा धावा हव्या असताना त्यानं टोलावलेला चेंडू थेट ट्रेन्ट बोल्टच्या हाती विसावला आणि विंडीजला पाच धावांनी हार स्वीकारावा लागली. ब्रेथवेट नावाचं हे वादळ मॅन्चेस्टरमध्ये पुन्हा घोंघावल्यास टीम इंडियाची चिंता वाढेल एवढं नक्की.

नंबर पाच - शेल्डन कॉट्रल

शेल्डन कॉट्रलचा विकेट घेतल्यानंतर हा आर्मीस्टाईल सॅल्यूट यंदाच्या विश्वचषकातलं खास आकर्षण ठरलं. या जमैकन गोलंदाजानं सहा सामन्यांत आतापर्यंत नऊ फलंदाजांना माघारी धाडलं आहे.

विश्वषकाच्या रणांगणात टीम इंडियाची घोडदौड सध्या निर्विवादपणे सुरु आहे. ही घोडदौड अशीच सुरु ठेऊन उपांत्यफेरीची दारं उघडायचा आता टीम इंडियाचा प्रयत्न असेल. पण त्याआधी विंडीजच्या या धोकादायक शिलेदारांसाठी खास रणनीती आखणं विराट आणि शास्त्रीगुरुजींसमोरचं मोठं आव्हान असेल.