लंडन : पाकिस्तानने न्यूझीलंडचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून, विश्वचषकातील आपलं आव्हान कायम राखलं आहे. बाबर आझमनं नाबाद शतक झळकावून पाकिस्तानच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याने 127 चेंडूंत अकरा चौकारांसह नाबाद 101 धावांची खेळी उभारली.


बाबर आझमच्या याच शतकी खेळीनं पाकिस्तानला पाच चेंडू राखून 238 धावांचं लक्ष्य गाठून दिलं. मोहम्मद हफिझनं 32, तर हॅरिस सोहेलनं 68 धावांच्या खेळी करून पाकिस्तानच्या विजयाला हातभार लावला.

न्यूझीलंडचा हा विश्वचषकातला पहिलाच पराभव, तर पाकिस्तानचा सात सामन्यांमधला तिसरा विजय ठरला. पाकिस्ताननं तिसरा विजय आणि सात गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर झेप घेतली.

जेम्स नीशाम आणि कॉलिन डी ग्रॅण्डहोमनं सहाव्या विकेटसाठी रचलेल्या 132 धावांच्या झुंजार भागिदारीनं न्यूझीलंडला संकटातून सावरलं आणि त्याच भागिदारीनं पाकिस्तानसमोर विजयासाठी 238 धावांचं आव्हानही उभं केलं आहे.

बर्मिंगहॅमच्या सामन्यात न्यूझीलंडनं पाच बाद 83 धावांवरून 50 षटकांत सहा बाद 237 धावांची मजल मारली. न्यूझीलंडच्या डावात नीशाम आणि ग्रॅण्डहोमच्या झुंजार फलंदाजीनं मोलाची भूमिका बजावली. ग्रॅण्डहोमनं 71 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकारासह 64 धावांची खेळी उभारली. नीशामनं 112 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 97 धावांची खेळी केली.