लंडन : विश्वचषकाच्या रणांगणात टीम इंडियाचा सामना आज तुल्यबळ न्यूझीलंडशी आहे. भारताने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला हरवून विश्वचषक मोहिमेची मोठ्या झोकात सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानला नमवून, तीनपैकी तीन सामन्यांमध्ये विजय साजरा केला आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड संघांत चुरशीचा सामना अपेक्षित आहे. पण विश्वचषकातल्या याही सामन्यावर पावसाचं सावट असल्याचा अंदाज आहे.


ट्रेन्ट बोल्ट, मॅट हेन्री, जीमी निशाम आणि लॉकी फर्ग्युसन... न्यूझीलंड संघाच्या या आक्रमणाने विश्वचषकाच्या मैदानात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आणि याच आक्रमणाचा सामना करण्यासाठी विराट कोहली आणि त्याचे शिलेदार सज्ज झाले आहेत.


भारत आणि न्यूझीलंडच्या फौजा विश्वचषकाच्या साखळी लढतीच्या निमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. नॉटिंगहॅमच्या ट्रेंन्ट ब्रीज मैदानावर हा सामना खेळवण्यात येणार आहे.


न्यूझीलंडने श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या तिन्ही लढतीत निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. न्यूझीलंडच्या या यशात मोलाचा वाटा उचललाय तो त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी. पहिल्या तिन्ही सामन्यांत न्यूझीलंडने प्रतिस्पर्धी संघाला ऑल आऊट करण्याचा पराक्रम गाजवला आहे. त्यात लॉकी फर्ग्युसननं सर्वाधिक आठ, मॅट हेन्रीनं सात, कॉलम फर्ग्युसननं सहा तर ट्रेन्ट बोल्टने पाच फलंदाजांना माघारी धाडलं आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना किवीजच्या या भेदक आक्रमणाचा सामना करताना खास रणनीती आखण्याची गरज आहे.


विश्वचषकाआधीच्या सराव सामन्यात न्यूझीलंडनं भारताला पराभवाची धूळ चारली होती. त्या पराभवातून धडा घेऊन विजयी वाटचाल करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल.


शिखर धवनची दुखापत ही टीम इंडियासाठीची चिंतेची बाब ठरावी. कारण याच शिखर धवननं गेल्या तीन आयसीसी स्पर्धांमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा झळकावण्याचा मान मिळवला होता. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध धवनची उणीव टीम इंडियाला नक्कीच जाणवेल. धवनच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलला सलामीची जबाबदारी पार पाडेल तर चौथ्या क्रमांकावर केदार जाधवला संधी मिळण्याची शक्यता आहे.


भारत आणि न्यूझीलंड विश्वचषकाच्या इतिहासात आजवर सात वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात चार वेळा न्यूझीलंडने तर तीन वेळा भारताने बाजी मारली आहे. विजय-पराजयाचे हेच समीकरण टीम इंडिया बरोबरीत सोडवणार का याचीच आता उत्सुकता आहे. त्यामुळे नॉटिंगहॅममध्ये कोणाची सरशी होणार न्यूझीलंडच्या आक्रमणची की भारतीय फलंदाजीची हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.