लंडन : टॉन्टनच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 41 धावांनी पराभव करत विश्वचषकात तिसरा विजय साजरा केला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं वॉर्नरच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानला 308 धावांचं लक्षं दिलं होतं. हे लक्ष गाठण्यासाठी पाकिस्तानने निकराचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला.


ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानची एकही मोठी भागीदारी होऊ दिली नाही. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तानला हार स्वीकारावी लागली. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनं तीन, मिचेल स्टार्क आणि केन रिचर्डसननं प्रत्येकी दोन पाकिस्तानच्या फलंदाजांना माघारी धाडलं.

त्याआधी, ऑस्ट्रेलियानं या सामन्यात 49 षटकांत सर्व बाद 307 धावांची मजल मारली. सलामीच्या डेव्हिड वॉर्नरचं शतक आणि त्यानं अॅरॉन फिन्चच्या साथीनं 146 धावांची दिलेली सलामी ऑस्ट्रेलियाच्या डावाचं वैशिष्ट्य ठरली. वॉर्नरनं 111 चेंडूंत अकरा चौकार आणि एका षटकारासह 107 धावांची खेळी उभारली. वॉर्नरच्या वन डे कारकीर्दीतलं हे चौदावं शतक ठरलं. तर फिन्चनं 84 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांसह 82 धावांची खेळी केली.