लंडन : महिला विश्वचषकातील 12 वर्षांपूर्वीचा पराभव विसरुन भारतीय महिला संघ विश्वविजेता होण्यासाठी लॉर्ड्सच्या मैदानात उतरणार आहे. कर्णधार मिताली राजच्या टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्ध मुकाबला होईल.


या महामुकाबल्यापूर्वी भारतीय संघासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. सेमीफायनलमध्ये 171 धावांची दमदार खेळी करणारी हरमनप्रीत कौर या सामन्यात दुखापतग्रस्त झाली आहे. त्यामुळे तिच्या समावेशाबाबत अजूनही शंका आहे.

शनिवारी सरावादरम्यान हरमनप्रीतच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर ती सरावासाठी मैदानात उतरलेली नाही. या सामन्यात हरमनप्रीतला खेळता आलं नाही, तर हा भारतासाठी मोठा धक्का असेल.

कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वात टीम इंडिया दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. 2005 साली भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र आता पुन्हा एकदा मिताली राजची महिला ब्रिगेड विश्वविजेता होण्यासाठी सज्ज झाली आहे.