नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नांदूरमध्यमेश्वर धरणाची पातळी मुसळधार पावसानं वाढली आहे. पाण्याचं हे रौद्ररुप पाहण्यासाठी नाशिककरांनी गर्दी करत आहेत. पण याच पाण्यात सेल्फीसाठी तरुणांची स्टंटबाजी सुरु आहे.


नाशिकपट्ट्यातील मुसळधार पावसानं नांदूरमध्यमेश्वर धरण भरले आहे. सध्या धरणातून 31 हजार 510 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे त्यातून सुरु असलेल्या विसर्गामुळे पाण्याचं रौद्र रुप पहायला मिळतं आहे.

पाण्याचं रौद्र रुप पाहण्यासाठी नाशिककरांनी धरण परिसरात मोठी गर्दी केली आहे. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे, इथं सेल्फी काढण्यासाठी नागरिक आपला जीव धोक्यात घालत आहेत. धोकादायक ठिकाणी जाऊन फोटो काढण्याचे प्रताप सुरु आहेत. काही जण तर थेट पाण्यात बसून स्टंटबाजी करताना दिसत आहेत.

दरम्यान, नाशिकमध्ये सध्या पावसानं जरी विश्रांती घेतली असली, तरी नाशकात मागील दिवसांमध्ये झालेल्या पावसानं जिल्ह्यातल्या धरणांतून गोदावरी नदीत पाण्याचा मोठा विसर्ग केला जात आहे. परिणामी गोदावरी नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सध्या गंगापूर धरणातून 10 हजार 278 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरूय तर दारणातून 16 हजार 875 क्युसेक्स आणि कडवा धरणातून 7 हजार 466 क्युसेक्सनं गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना, रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.