मुंबई : इंग्लंडमध्ये यावर्षी भरवल्या जाणाऱ्या विश्वचषकाआधी 'आयसीसी ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक 2020'चं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 21 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियात महिलांच्या विश्वचषकाला सुरुवात होईल. महिला विश्वचषकाचा अंतिम सामना जागतिक महिला दिनी म्हणजेच 8 मार्चला खेळवण्यात येणार आहे. टी20 विश्वचषकात सर्वोत्तम दहा संघ सहभागी होणार आहेत. त्यात भारतीय महिला संघाचा समावेश 'अ' गटात करण्यात आला आहे. 2018 च्या अखेरीस आयसीसीने जाहीर केलेल्या टी 20 आंतरराष्ट्रीय रँकिंगनुसार आठ संघांना विश्वचषकात थेट प्रवेश मिळाला आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान हे ते आठ संघ.
ICC T20 World Cup 2020 | टी20 विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर
भारताचा समावेश असलेल्या 'अ' गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंका या संघांचा समावेश आहे. तर 'ब' गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान हे संघ आहेत. 21 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत दहा संघ एकूण 23 सामने खेळतील. भारतीय महिला संघाचा गटातला सलामीचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. ऑस्ट्रेलियात आयोजित पुरुषांचा टी20 वर्ल्डकप 18 ऑक्टोबर 2020 रोजी सुरु होणार असून अंतिम सामना 15 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. विराट कोहलीची टीम इंडिया 24 ऑक्टोबरला सलामीच्या सामन्यात पर्थच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेशी खेळेल.