मुंबई : ज्येष्ठ कामगार नेते आणि भारताचे माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे आज दीर्घ आजाराने निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर देशभरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील असंख्य लोकांनी समाजमाध्यामांद्वारे, माध्यमांद्वारे फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहिली, परंतु राज यांनी समाजमाध्यमांवर केवळ एक मॅसेज न लिहिता नेहमीप्रमाणे व्यंगचित्राचं माध्यम निवडले आहे.

जॉर्ज फर्नांडिस यांना व्यंगचित्राद्वारे श्रद्धांजली अर्पण करत राज यांनी 'सम्राट' कायमचा 'बंद' झाला... अशी समर्पक भावनादेखील व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे फर्नांडिस भाषण करताना जसे उभे रहायचे अगदी तसेच व्यंगचित्र राज यांनी रेखाटले आहे.

फर्नांडिस हे कामगारांचे नेते होते. त्यांनी कामगारांच्या अनेक चळवळींचे नेतृत्व केले होते. कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी फर्नांडिस यांनी अनेक आंदोलनं उभारली, चळवळी केल्या, बंद पुकारले. विशेष म्हणजे सगळे बंद यशस्वीदेखील केले. त्यामुळेच फर्नांडिस यांना देशात बंदसम्राट म्हणून ओळखले जाऊ लागले. याच गोष्टीचा विचार घेऊन राज यांनी फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व्यंगचित्र रेखाटले आहे.