मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शतकाने विराटच्या गुणांमध्ये वाढ केली.
श्रीलंकेविरुद्धच्या कोलकाता कसोटीत विराटने त्याच्या कारकीर्दीतलं अठरावं शतक साजरं केलं. त्याच्या या शतकाने टीम इंडियाला पराभवाच्या संकटातून वाचवलं आणि श्रीलंकेसमोर विजयासाठीचं मोठं लक्ष्य उभं केलं होतं. याच कामगिरीने विराटला आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत डेव्हिड वॉर्नरचा पाचवा क्रमांक मिळवून दिला आहे. ताज्या क्रमवारीत वॉर्नरची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
रवींद्र जाडेजाची घसरण
श्रीलंकेविरुद्धच्या कोलकाता कसोटीत एकही विकेट मिळवता न आलेल्या रवींद्र जाडेजाची आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. जाडेजाने कोलकाता कसोटीत त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावली असती, तर आयसीसी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानावर विराजमान होण्याची त्याला संधी होती.
कोलकाता कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये मिळून त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्यामुळे कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत त्याची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली. एक अष्टपैलू म्हणूनही जाडेजाला कोलकाता कसोटीवर ठसा उमटवता आला नाही. त्यामुळे अष्टपैलूंच्या आयसीसी क्रमवारीतही त्याने 20 गुण गमावले आहेत. त्या क्रमवारीत जाडेजा दुसऱ्या स्थानावर आहे.