मुंबई : इंग्लंडमध्ये यावर्षी भरवल्या जाणाऱ्या विश्वचषकाआधी 'आयसीसी ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक 2020'चं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियात आयोजित पुरुषांचा टी20 वर्ल्डकप 18 ऑक्टोबर 2020 रोजी सुरु होणार असून अंतिम सामना 15 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे.


टी20 विश्वचषकात सर्वोत्तम बारा संघ सहभागी होणार असून भारताचा समावेश 'ब' गटात करण्यात आला आहे. 2018 च्या अखेरीस आयसीसीने जाहीर केलेल्या टी 20 आंतरराष्ट्रीय रँकिंगनुसार आठ संघांना विश्वचषकात थेट प्रवेश मिळाला आहे. पाकिस्तान, भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज आणि अफगाणिस्तान हे ते आठ संघ. टी 20 विश्वचषकाच्या प्राथमिक फेरीनंतर उर्वरित चार संघांची निवड होईल.
महिला टी20 विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर

विराट कोहलीची टीम इंडिया 24 ऑक्टोबरला सलामीच्या सामन्यात पर्थच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेशी खेळेल. भारताचा समावेश असलेल्या 'ब' गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघांचा समावेश आहे. तर 'अ' गटात पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज हे संघ आहेत.

सात वेगवेगळ्या मैदानांवर 16 संघांमध्ये एकूण 45 सामने या टूर्नामेंटमध्ये खेळवले जातील. डे-नाईट स्वरुपात हे सामने खेळवले जाणार आहेत. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर 15 नोव्हेंबर 2020 रोजी अंतिम सामना होणार असून सेमी फायनल सामने 11 आणि 12 नोव्हेंबरला सिडनी आणि अॅडलेडमध्ये खेळवण्यात येतील.