वर्णद्वेषी टीका केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या कर्णधारावर 4 सामन्यांची बंदी
एबीपी माझा वेब टीम | 27 Jan 2019 11:41 PM (IST)
आयसीसीच्या कारवाईमुळे सरफराजला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे दोन एकदिवसीय सामने आणि टी-20 मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये खेळता येणार नाही.
मुंबई : पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदवर आयसीसीकडून चार सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वन डेत वर्णद्वेषी टीका केल्याप्रकरणी सरफराजवर ही कारवाई करण्यात आली आहे. या सामन्यात सर्फराजनं दक्षिण आफ्रिकेच्या अँडील फेलुकवायोला उद्देशून वर्णद्वेषी आणि आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. सर्फराजचं हे बोलणं स्टंम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालं. त्यामुळे आयसीसीनं सर्फराजवर कठोर कारवाई करताना 4 सामन्यांची बंदी घातली. सरफराजवरील कारवाईची माहिती आयसीसीने ट्वीट करून दिली आहे. 'आयसीसीच्या अँटी रेसिझम कोडचं उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदला चार सामन्यांसाठी निलंबित करण्यात आलं आहे,' असं आयसीसीने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. आयसीसीच्या कारवाईमुळे सरफराजला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे दोन एकदिवसीय सामने आणि टी-20 मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये खेळता येणार नाही.