कल्याण : सरकारने आजवर किती अनुसूचित जातीतील लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला आहे? असा सवाल एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. कल्याणमध्ये आयोजित वंचित आघाडीच्या सभेत ओवेसी बोलत होते.


बाबासाहेब आंबेडकर आणखी काही वर्षे जिवंत असते, तर रोहित वेमुलाचा मृत्यू झाला नसता, असं म्हणत ओवेसी यांनी भाजप सरकारवर हल्ला चढवला. तसेच सरकार भारतरत्न पुरस्कार देतानाही जात पात बघूनच पुरस्कार देत असल्याचा आरोप ओवेसी यांनी केला.


आजवर सरकारनं किती अनुसूचित जातीतील लोक, आदिवासी आणि मुसलमानांना भारतरत्न दिला? असा परखड सवाल करत त्यांनी हे जातीयवादी सरकार उखडून फेकण्याचं आवाहन केलं.


आरएसएस दहशतवादी संघटना : प्रकाश आंबेडकर


तर दुसरीकडे भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही सरकार आणि आरएसएसवर जोरदार हल्ला चढवला. आरएसएस ही दहशतवादी संघटना असून आरएसएस शस्त्रांची पूजा करते. त्यांच्या डोंबिवलीच्या स्वयंसेवकांकडे शस्त्रसाठा सापडतो.


संघाला देशात दंगली घडवायच्या आहेत का? लष्कर असताना आरएसएसकडे शस्त्रांची गरज काय आहे? असा सवालही आंबेडकरांनी उपस्थित केला. कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये वंचित आघाडीची ही सभा पार पडली. या सभेला भारिप आणि एमआयएम कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.