मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमराने आयसीसीच्या वन डे क्रमवारीत फलंदाज आणि गोलंदाजांच्या यादीत आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या या यादीत विराट कोहलीच्या खात्यात सर्वाधित 895 गुणांची नोंद आहे. कोहलीपाठोपाठ टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा 863 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर गोलंदाजांमध्ये दुखापतीनंतरही जसप्रीत बुमरा 797 गुणांसह आपला पहिला नंबर टिकवून आहे.


रोहित शर्मा सध्या क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सुपर फॉर्ममध्ये आहे. क्रमवारीच्या बाबतीत रोहित सध्या वन डे, कसोटी आणि ट्वेन्टी ट्वेन्टीत टॉप टेन फलंदाजांमध्ये आहे. रोहितनं यंदाच्या कॅलेंडर वर्षात 25 वन डे सामन्यांत 1232 धावांचा रतीब घातला आहे. त्यात तब्बल सहा शतकं आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.


जसप्रीत बुमरा सध्या पाठीच्या दुखापतीवर उपचार घेत आहे. पण तरीही दुसऱ्या क्रमांकावरच्या ट्रेन्ट बोल्टपेक्षा मोठ्या फरकानं पहिला क्रमांक राखून आहे. गोलंदाजांमध्ये न्यूझीलंडचा बोल्ट 740 गुणांसह दुसऱ्या तर अफगाणिस्तानचा मुजीब उर रेहमान तिसऱ्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हार्दिक पंड्या या एकमेव भारतीय खेळाडूचा समावेश आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्या दहाव्या क्रमांकावर आहे.


आयसीसीच्या वन डे क्रमवारीतले टॉप थ्री-


फलंदाज


विराट कोहली (भारत) 895
रोहित शर्मा (भारत) 863
बाबर आझम (पाकिस्तान) 834


गोलंदाज


जसप्रीत बुमरा (भारत) 797
ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) 740
मुजीब उर रेहमान (अफगाणिस्तान) 707


अष्टपैलू


बेन स्टोक्स (इंग्लंड) 319
मोहम्मद नबी (अफगाणिस्तान) 307
इमाद वसिम (पाकिस्तान) 295