मुंबई : भाजपच्या सत्तेसाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. लवकरच 145 आमदारांची जुळवाजुळव करुन सत्तास्थापनेसाठी भाजपला मदत करणे हे माझे कर्तव्य आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. विधानसभेच्या निकालानंतर सत्तापेच निर्माण झाला असताना नारायण राणे पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडली नाही. देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर राणे पत्रकारांशी बोलत होते.


राज्यात सत्ता स्थापनेला विलंब होतो आहे, हे योग्य नाही. जनतेची ज्यांना काळजी आहे असं सांगत आहेत, यांच्यामुळेच राज्यात सत्तास्थापनेस विलंब होतो आहे. आम्ही राज्यपालाकडे जाऊ तेव्हा यादी घेऊन जाऊ. आज मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. मुख्यमंत्र्यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करु, असं सांगितल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.



मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आदेश दिले आहेत. मला आशा की राज्यात भाजपची सत्ता येईल. सत्ता येण्यासाठी जे जे शक्य असेल ते मी करेन. सत्ता स्थापन करायला भाजपला मी मदत करेन. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक बैठका आजही पार पडल्या. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाईल, असं वाटत नाही. राज्यात राष्ट्रपती राजवटीला शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला. निवडणुकीआधी युती झाली असताना, निकालानंतर युती तोडणे हे नैतिकतेला धरुन नाही, असं नारायण राणेंनी म्हटलं.


काँग्रेस -राष्ट्रवादीच्या केवळ बैठका होत आहेत, मात्र त्यात कोणताही निर्णय होत नाही. शिवसेनेला उल्लू बनवायचं काम सुरु आहे. काँग्रेसचे नेते समोर काय बोलतात पाठीमागे काय बोलतात हे उद्धव ठाकरे यांना समजलं पाहिजे.