नवी दिल्ली : भारताचं क्रिकेट बोर्ड बीसीसीआय आणि पाकिस्तानचं क्रिकेट बोर्ड पीसीबी यांच्यात अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. या वादावर आयसीसी आज सुनावणी करणार आहे. पीसीबीने बीसीसीआयकडे करोडो रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.


पीसीबीने आरोप केला आहे की, बीसीसीआयने पाकिस्तानात मालिका खेळण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात बीसीसीआयने दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही. भारत पाकिस्तान यांच्यात मालिका न झाल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं जवळपास 447 कोटींचं नुकसान झाल्याचा दावा पीसीबीनं केला आहे. तसेच नुकसान भरपाईची मागणी पीसीबीनं केली आहे. मात्र बीसीसीआयनं नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच नसल्याचं स्पष्ट केलं आहे.


आयपीएलचे चेयअरमन राजीव शुक्ला यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास काहीच समस्या नाही. मात्र काही मुद्दे सरकारी पातळीवर सोडवणे गरजेचं आहे. तसेच बीसीसीआय आणि पीसीबीने आयसीसीकडे न जाता चर्चा करून यावर तोडगा काढायला हवा. भारतही पाकिस्तानात जाऊन क्रिकेट खेळण्यास तयार आहे, मात्र त्यासाठी सरकारची परवानगी आवश्यक आहे."





बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर म्हणाले की, "गेल्या अनेक वर्षांपासून भारतच नाही तर इतरही देश पाकिस्तानचा दौरा करत नाहीत. भारताच्या एकाही अधिकाऱ्यांने पाकिस्ताने केलेल्या दाव्याच्या सुनावणीत सहभागी झालं नाही पाहिजे. तसेच बीसीसीआयने पीसीबीला एकही पैसा दिला नाही पाहिजे."