अहमदाबाद : कुलदीप, जडेजा, सिराज, बुमराह आणि हार्दिक यांच्या घातक गोलंदाजीनंतर, कॅप्टन रोहित शर्माच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर भारताने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाकिस्तानचा 117 चेंडू आणि 7 गडी राखून पराभव केला. एकदिवसीय विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा हा सलग आठवा विजय आहे. त्यामुळे भारताला विश्वचषकात ( ICC Cricket World Cup 2023) पराभूत करण्याचे पाकिस्तानचे स्वप्न पुन्हा एकदा पूर्ण होऊ शकले नाही.






फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत पाकिस्तानचा डाव अवघ्या 191 धावांत गुंडाळला. यानंतर अहमदाबादमध्ये रोहित शर्माचे तुफान आले आणि बाबर आझमच्या संघाला घेऊन गेले. रोहितने पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. हिटमॅनने अवघ्या 63 चेंडूत 86 धावांची शानदार खेळी केली. मात्र, त्याचे शतक हुकले. त्याने 6 चौकार आणि 6 षटकार मारले. 2023 च्या विश्वचषकात भारताचा हा सलग तिसरा विजय आहे.


बुमराहची विराट कामगिरी 


पाकिस्तानच्या फलंदाजीला खिंडार पाडण्याचे काम प्रथम कुलदीप यादवने केले. त्याने सौद शकील आणि इफ्किकार अहमदला बाद केले. त्यानंतर रिझवान आणि शादाब खानची दांडी बुमराहने गुल केली. बुमराहच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानने सपशेल नांगी टाकली. बुमराहने 7 षटकांत केवळ 19 धावा देताना 2 विकेट घेतल्या. एक ओव्हर निर्धाव टाकली. त्याच्या याच कामगिरीमुळे सामन्याचा मानकरी ठरला. वर्ल्डकपच्या इतिहासात दुसऱ्यांदा वेगवान गोलंदाज सामन्याचा मानकरी ठरला. पाकिस्तानकडे शाहीन आफ्रिदी, हसन अली, हॅरिस रौफ असा वेगवान मारा असतानाही रोहितने त्यांची पुरती धुलाई केली. 






तत्पूर्वी, पाकिस्तानने दिलेल्या 192 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी झंझावाती सुरुवात करून दिली. गिल 11 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने 16 धावा करून बाद झाला. शाहीन आफ्रिदीने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर किंग कोहली आणि रोहितने पाकिस्तानी गोलंदाजांना फटकारण्यास सुरुवात केली. मात्र, तीन चौकारांच्या मदतीने 18 धावा करून कोहली बाद झाला.


गिल आणि कोहली बाद झाल्यानंतरही रोहितने आपली आक्रमक वृत्ती कायम ठेवली आणि मैदानाभोवती फटके खेळले. रोहितने वनडेमध्ये 300 षटकारही पूर्ण केले. मात्र, भारतीय कर्णधाराला शतक झळकावता आले नाही. शाहीन आफ्रिदीने रोहितला वैयक्तिक 86 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यादरम्यान हिटमॅनने 6 चौकार आणि 6 षटकार मारले. शेवटी श्रेयस अय्यर 62 चेंडूत 53 धावा काढून नाबाद परतला. अय्यरने आपल्या अर्धशतकी खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याच्यासोबत केएल राहुल 19 धावांवर नाबाद राहिला.


याआधी फलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी आश्चर्यकारक कामगिरी केली. जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक 50 धावा केल्या.