England vs Afghanistan : विश्वविजेत्या इंग्लंडने स्वप्नातही कल्पना केली नसेल अशी दमदार कामगिरी आज अफगाणिस्ताने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर केली. 285 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या विश्वविजेत्या इंग्लंडला 210 धावांमध्ये गुंडाळत 69 धावांनी दणदणीत विजय मिळवला. तब्बल 15 व्या सामन्यात अफगाणिस्तानने वर्ल्डकपमध्ये पहिल्या विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानची फिरकी त्रिमूर्ती असलेल्या मुजीबूर रहमान (3 विकेट), रशीद खान (3 विकेट) आणि मोहम्मद नबी (2 विकेट) यांनी आठ विकेट घेत इंग्लंडला पार नेस्तनाबूत झाला. फारुकी आणि नावीन हकने प्रत्येकी एक विकेट घेतली. पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणिस्तानने इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडतना 284 धावा कुटल्या. इंग्लंडने या सामन्यामध्ये तब्बल सात गोलंदाजांचा वापर केला, तरीही अफगाणिस्तानला रोखण्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना यश आलं नाही. अफगाणिस्तानचा डाव शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर संपला. त्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजांना फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.
285 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या इंग्लंडची अवस्था सुद्धा अत्यंत बिकट झाली. 4 बाद 91 अशी अवस्था 17.2 षटकांत झाली. अफगाणिस्तानच्या फिरकी माऱ्यासमोर इंग्लंडचा एकही फलंदाज तग धरू शकला नाही. यामध्ये फक्त मधल्या फळीतील हॅरी ब्रुकचा अपवाद राहिला. त्याने 61 चेंडूत 66 धावा करत इंग्लंडचा डाव सावरला. मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने कोणत्याही फलंदाजाची अपेक्षित साथ मिळाली नाही. अफगाणिस्तानने फिरकीचा प्रभावीपणे मारा केला. अफगाणिस्तान फिरकीच्या जाळ्यामध्ये इंग्लंडचा संघ पूर्णतः अडकून गेला. कोणत्याही फलंदाजालांचा फिरकीचा सामना करता आला नाही.
इंग्लंडच्या डावाची सुरुवात जॉनी बेअरस्टाॅ आणि डेव्हिड मालन यांनी केली. मात्र बेअरस्टाॅ अवघ्या दुसऱ्या षटकामध्ये बाद झाला. त्याला फारुकीने बाद करत अफगाणिस्तानला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला जो रूट सुद्धा स्वस्तात परतला. त्याला सातव्या षटकामध्ये मुजीफने क्लीन बोल्ड करत अफगाणिस्तान संघाला दुसरे यश मिळवून दिले. त्यामुळे इंग्लंडची अवस्था दोन बाद 33 अशी झाली. डेव्हिड मालन एका बाजूने किल्ला लढवत असतानाच 13 व्या षटकांत नबीने बाद करत आणखी एक यश अफगाणिस्तानला मिळवून दिले. त्यामुळे इंग्लंडची अवस्था 3 बाद 68 अशी झाली. त्यानंतर इंग्लंडचा डाव सावरलाच नाही. दरम्यान, अफगाणिस्तानने मागील सामन्यात भारताविरुद्ध 73 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र गोलंदाजीमध्ये त्यांची हवा निघाली होती. आज मात्र फलंदाजीसह गोलंदाजीमध्येही अफगाणिस्तानच्या संघाकडून चमकदार कामगिरी झाली.
विश्वविजेत्या इंग्लंडसमोर अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करत 284 धावा ठोकल्या. अफगाणिस्तानने 49.5 षटकात सर्व बाद 284 धावा केल्या. सुरुवात दमदार मग पडझड आणि पुन्हा कमबॅक असा अफगाणी फलंदाजीचा आलेख राहिला. अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमदुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झरदान यांनी दमदार फलंदाजी करताना पहिल्याच विकेटसाठी 16.4 षटका 114 धावांची दमदार सलामी दिली. त्यामुळे मोठ्या संख्येचा पाया रचला गेला. त्यानंतर तीन झटपट विकल्याचे गमावल्यामुळे अफगाणिस्तानचा डाव अडचणीत आला होता. मात्र, मधल्या फळीतील इक्रम अलीखीलने केलेल्या 58 धावांच्या खेळीमुळे अडीचशेचा टप्पा पार करता आला. रशीद खान आणि मजीफूर रहमान यांनीही छोटेखानी खेळी करत अफगाणिस्तानला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले