लंडन : वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानवर 23 धावांनी मात करुन, आपल्या विश्वचषक मोहिमेची सांगता विजयाने केली. अफगाणिस्तानचा यंदाच्या विश्वचषकातला हा नऊ सामन्यांमधला सलग नववा पराभव ठरला. या सामन्यात विंडीजने अफगाणिस्तानला 312 धावांचे आव्हान दिले होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणी फलंदाजांनी 288 धावांची मजल मारली. यष्टिरक्षक इक्रम अली खानने सर्वाधिक 86 धावांची खेळी उभारली. रहमत शाहने ६२ धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. विंडीजकडून कार्लोस ब्रॅथवेटनं सर्वाधिक चार तर केमार रोशने तीन अफगाणी फलंदाजांना माघारी धाडले.
तत्पूर्वी या सामन्यात वेस्ट इंडिजने 50 षटकांत सहा बाद 311 धावांचा डोंगर उभारला होता. शाय होप, एविन लुईस आणि निकोलस पूरनच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर विंडीजने ही कामगिरी बजावली. होपनं 92 चेंडूत 77 धावांची खेळी केली. लुईसनं आणि निकोलस पूरननं प्रत्येकी 58 धावांचा वाटा उचलला. त्यामुळंच विंडीजला तीनशेचा टप्पा पार करता आला. अफगाणिस्तानकडून दवलत जादरान याने दोन फलंदाजांनी बाद केले.
गुणतालिका