लंडन : विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारतीय संघाचा पराभव करत घरचा रस्ता दाखवला. भारताला सेमीफायनलपर्यंत नेण्यात सिंहाचा वाटा उचलणारा रोहित शर्मा सेमीफायनलच्या सामन्यात अवघी एक धाव करुन बाद झाला. पॅव्हेलियनमध्ये उभा राहून रोहित शर्मा एक-एक करुन बाद होणारे भारतीय फलंदाज पाहून हळहळल्याचे आपण सर्वांनी पाहिले. अनेकांना सामना हरल्यापेक्षा रोहितचा रडवेला चेहरा पाहून गहिवरुन आले. या सामन्यातील पराभवानंतर रोहित शर्माने माध्यमांशी बोलणे टाळले. परंतु रोहितने ट्वीटरच्या माध्यमातून त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रोहितने ट्वीटच्या माध्यमातून केवळ त्याचे दुःख जाहीर केले नाही, तर त्याने संघाची चूक मान्य केली आहे, तसेच पाठिंबा दर्शवणाऱ्या चाहत्यांचे आभारदेखील मानले आहेत.

रोहित शर्माने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, एक संघ म्हणून आम्ही चांगले प्रदर्शन करण्यात यशस्वी ठरलो. परंतु सेमीफायनलच्या सामन्यात 30 मिनिटांच्या खराब खेळाने आमचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न हिरावलं आहे. माझ अंतःकरण जड झालं आहे, मला माहित आहे तुमचीदेखील अशीच परिस्थिती असेल. स्पर्धा भारताबाहेर असूनही आम्हाला जबरदस्त समर्थन मिळाले. भारतीयांनी इंग्लंडमधल्या स्टेडियम्सना निळ्या रंगात बुडवलं होतं. आम्हाला खूप पाठिंबा मिळाला. त्यासाठी धन्यवाद.

विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपलेली पाहायला मिळाली. रोहितने अवघ्या नऊ सामन्यांमध्ये 648 धावा केल्या. त्यामध्ये त्याच्या 5 शतकांचा आणि एका अर्धशतकाचा समावेश होता. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडुंच्या यादीत रोहित पहिल्या स्थानावर आहे. रोहितच्या जबरदस्त फॉर्ममुळेच भारत सहज सेमीफायनलपर्यंत पोहोचू शकला, तसेच गुणतालिकेत भारताने पहिले स्थानदेखील काबीज केले होते.


आपल्या षटकारानं दुखापतग्रस्त झालेल्या चाहतीला रोहित शर्माकडून लई भारी गिफ्ट | ABP Majha