मुंबई : राज्यभरात सध्या आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. विविध दिंड्यांमधील वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. विठ्ठलाच्या दर्शनासाठी विठ्ठल मंदिरापासून सुमारे 8 ते 9 किलोमीटरपर्यंत (गोपाळपूरपर्यंत) भाविकांची रांग लागली आहे. राज्यभरात विठ्ठलाची हजारो मंदिरं आहेत. या सर्व मंदिरांमध्ये सकाळपासून भाविकांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.


विदर्भ पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करण्यात येतो. जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाहीत, असे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात. आज आषाढी एकादशी असल्याने भाविकांची पावलं शेगावकडे वळली आहेत. पहाटेपासून शहर व मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेला आहे.

पुण्यातील शाळेत रंगला वाखरीचा पालखी रिंगण सोहळा
पुण्यामधील बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे आषाढी एकादशीनिमित्त वाखरीचे पालखी रिंगण साकारण्यात आले. प्रभात टॉकीजसमोरील नू. म. वि. प्राथमिक शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ज्ञानोबा.. माऊली.. तुकाराम...च्या अखंड जयघोषाने दुमदुमलेले शाळेचे प्रांगण... टाळ-मृदुंग वाजवत हरी नामाच्या गजरात तल्लीन झालेले बालचमू... दिंड्या आणि भगवे पताके हाती घेवून अश्वाच्या मागे धावत चिमुकल्यांनी पालखी रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला. डोळ्यांचे पारणे फेडणारा वाखरीचा पालखी रिंगण सोहळा पुण्यात अनुभवण्याची संधी उपस्थितांना मिळाली. अशा चैतन्यमय वातावरणात वरुण राजाच्या साक्षीने छोट्या वारकऱ्यांचा पालखी रिंगण सोहळा रंगला.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने नाशिकच्या विठ्ठल मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे. शहरातील सर्वच मंदीरं सजविण्यात आली असून पहाटेपासूनच मंदिरात महापूजा केली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर भजन किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व उत्सवाची सांगता आजच्या महापूजा आणि महाप्रसादाने होणार आहे. शहरातील मंदिरं दिवसभर दर्शनासाठी खुली ठेवली जाणार आहेत.

सिंधुदुर्गातही आषाढीचा उत्साह
आषाढी एकादशीनिमित्त कुडाळमधील जि.प. प्रा. शाळा कुंभारवाडाच्या विद्यार्थ्यांची वारी हनुमान मंदिरातील हरिनाम सप्ताहात सहभागी झाली. विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख, वारीचा परिचय व्हावा, तसेच अभंग गायन, टाळांचा निनाद व तालबद्ध नृत्य, लेझिम पथक, वेशभूषा अशा प्रकारे कला, कार्यानुभव, शारिरीक शिक्षण या सर्वच विषयांना पूरक असा स्तुत्य व आनंददायी उपक्रम घेण्यात आला.

हिंगोलीत अवतरले पंढरपूर, 2 लाख भाविकांचे हिंगोलीमधल्या नामदेव मंदिरात दर्शन
जे भाविक आषाढी एकादशीला पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाऊ शकले नाहीत. ते भाविक संत नामदेवांच्या दर्शनासाठी नर्सी या ठिकाणी आवर्जून येत असतात. नामदेवांचे दर्शन झाल्याने प्रत्यक्षात विठुरायाचेच दर्शन झाल्याचा साक्षात्कार भाविकांना होत असतो. त्यामुळे भाविक मोठ्या उत्साहाने येथे गर्दी करतात. आज दिड ते दोन लाख भाविकांनी दर्शन केले.