न्यूझीलंडने दिलेले 240 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. 3.1 षटकांमध्ये भारताची 3 बाद 5 अशी बिकट अवस्था झाली होती. त्यानंतनर रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक डाव सावरतील असे वाटत होते. परंतु 25 चेंडूत 6 धावांवर असताना निशमच्या हाती झेल देऊन कार्तिकदेखील पव्हेलियनमध्ये परतला.
सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली प्रत्येकी एक धाव काढून बाद झाले आहेत. त्यानंतर रिषभ पंत (56 चेंडूत 32) हार्दिक पंड्या (62 चेंडूत 32) या दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु थोड्याफार धावांच्या फरकाने हे दोघेदेखील माघारी परतले. 31 व्या षटकात भारताची अवस्था 6 बाद 92 अशी होती. परंतु त्यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजा मैदानात उतरला आणि त्याने भारतीयांच्या मनात विजयाच्या आशा पल्लवित केला.
जडेजाने एकट्याने न्यूझीलंडला कडवी झुंज दिली. त्याने 59 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या सहाय्याने 77 धावांची धडाकेबाज खेळी केली. परंतु त्याला शेवटपर्यंत टिकता आले नाही. त्याला धोनीने 72 चेंडूत 50 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. परंतु धोनीला शेवटपर्यंत त्याच्या लौकिकाला साजेशी खेळी करता आली नाही. धोनीच्या या खेळीत अवघ्या एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आज प्रभावी मारा केला. त्याला त्यांच्या शेत्ररक्षकांनीदेखील जबरदस्त साथ दिली. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने 10 षटकात 37 धावा देत भारताचे 3 फलंदाज बाद केले. हेन्रीला ट्रेन्ट बोल्ट (10 षटकांत 42 धावा देत 2 गडी बाद) आणि मिचेल सेंट्नर (10 षटकात 34 धावा देत 2 गडी बाद) या दोघांनी चांगली साथ दिली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 50 षटकांत आठ बाद 239 धावांपर्यंत मजल मारली होती. सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडने 46 षटकं आणि एका चेंडूत 5 बाद 211 धावांची मजल मारली होती. न्यूझीलंडने आज उर्वरित 23 चेंडूत तीन गडी गमावून फक्त 28 धावांचीच भर घातली.
न्यूझीलंडच्या डावात कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलर या अनुभवी फलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली. विल्यमसनने 95 चेंडूत सहा चौकारांसह 67 धावांची, तर टेलरनं 90 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकारासह 74 धावांची खेळी उभारली.
भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना शेवटपर्यंत जखडून ठेवले होते. अनुभवी भुवनेश्वर कुमारने 10 षटकात 43 धावा देत 3 गडी बाद केले. जसप्रीत बुमराहने 10 षटकात 39 धावा देऊन 1 गडी बाद केला. रवींद्र जडेजाने गोलंदाजी करताना खूप कंजुसी दाखवली. त्याने 10 षटकात 34 धावा देत 1 गडी बाद केला.