लंडन : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत आज (20 जून) झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांग्लादेशवर 48 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नरच्या धडाकेबाज 166 धावांच्या खेळीच्या जोरावर बांग्लादेशसमोर 381 धावांचा डोंगर उभा केला होता. 382 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या बांग्लादेशच्या संघाने निर्धारित 50 षटकात 8 बाद 333 धावांपर्यंतच मजल मारली. बांग्लादेशकडून मुशफिकूर रहीमची (नाबाद 102 धावा) झुंज अपयशी ठरली.

कांगारुंचे 382 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या बांग्लादेशकडून मुशफिकूर रहीमने 9 चौकार आणि एका षटकारासह 97 चेंडूत 102 धावांची खेळी केली. तसेच सलामीवीर तमीम इक्बाल (74 चेंडूत 62) आणि मधल्या फळीत मोहमदुल्लाह (50 चेंडूत 69)या दोघांनी अर्धशतकी खेळी केल्या परंतु या तिघांची फलंदाजी बांग्लादेशला विजय मिळवून देऊ शकली नाही.

ऑस्ट्रिलयाकडून मॉर्कस स्टॉयनिस (54 धावात 2 बळी), मिचेल स्टार्क (55 धावात 2 बळी)आणि नॅथन कुल्टर नाईल (58 धावात 2 बळी) या तिघांनी ठरावीक अंतराने बांग्लादेशच्या फलंदाजांना बाद करत सामन्यावर शेवटपर्यंत पकड ठेवली होती. परिणामी बांग्लादेशचा डाव 333 धावांवर थांबला.

तत्पूर्वी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने बांगलादेशसमोर पाच बाद 381 धावांचा डोंगर उभारला होता. वॉर्नरने 147 चेंडूत 166 धावांची खेळी उभारली. त्याच्या या खेळीला 14 चौकार आणि पाच षटकारांचा साज होता. विश्वचषकाच्या इतिहासात वॉर्नरने दीडशेपेक्षा जास्त धावा करण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. विश्वचषकात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे.


वॉर्नरनं या सामन्यात कर्णधार अॅरॉन फिन्चच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 121 धावांची तर उस्मान ख्वाजासह दुसऱ्या विकेटसाठी 192 धावांची भागीदारी रचली. फिन्चने 51 चेंडूत 53 तर ख्वाजाने 72 चेंडूत 89 धावांची खेळी केली. अखेरच्या षटकांमध्ये ग्लेन मॅक्सवेलने (10 चेंडूत 32 धावा) छोटीशी परंतु जलद खेळी करुन संघाला 381 धावांपर्यंत मजल मारुन दिली.