मुंबई : नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणानंतर राज्यात असलेला अॅन्टी रॅगिंग कायदा अजून कडक करण्यासाठी राज्य सरकार पावलं उचलणार आहे. यासाठी सरकार समिती स्थापन करणार असून त्याबाबत काम करणार आहे.


निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दिक्षित यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन होणार आहे. समितीचा प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाकडे आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या अॅन्टी रॅगिंग संदर्भातील कायद्यात सुधारणा करून हा कायदा कशा पद्धतीने कडक केला जाऊ शकतो, यावर ही समिती काम करणार आहे.


कोण असतील समितीतील सदस्य?


प्रवीण दीक्षित, निवृत्त पोलीस महासंचालक
डॉ. संजय ओक, माजी अधिष्ठाता, केईएम रूग्णालय, मुंबई
डॉ. कालिदास चव्हाण, रजिस्टार, महाराष्ट्र युनिवर्सिटी आरोग्य विज्ञान
डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, जे.जे समूह रुग्णालय यांचा या समितीत समावेश करण्याची शिफारस


डॉ. पायलने नायर रुग्णालयाच्या वसतीगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्यावर सतत जातीवाचक शेरेबाजी करुन तिचा मानसिक छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केली, असा आरोप कुटुंबियांनी केल्यामुळे पोलिसांनी तिच्या तीन सहकारी महिला डॉक्‍टरांना अटक केली आहे.


यामध्ये डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांचा समावेश आहे. आग्रीपाडा पोलिसांनी तिन्ही डॉक्‍टरांवर रॅगिंग आणि ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.


VIDEO | माझं गाव माझा जिल्हा | राज्याच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांचा आढावा