8 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा कोहली सर्वात वेगवान फलंदाज
एबीपी माझा वेब टीम | 15 Jun 2017 10:32 PM (IST)
लंडन : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आंतरराष्ट्रीय वन डेमध्ये 8 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपान्त्य फेरीत बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात कोहलीने हा टप्पा ओलांडला. अवघ्या 175 डावांमध्ये त्याने ही मजल मारली. कोहलीने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डीव्हिलियर्सचा रेकॉर्ड मोडित काढला. बर्मिंगहॅममध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपान्त्य फेरीत बांगलादेशविरोधात कोहलीने 78 चेंडूत 96 धावांचा डोंगर रचला. डीव्हिलियर्सने ऑगस्ट 2015 मध्ये 182 इनिंग्जमध्ये वन डे सामन्यात 8 हजार धावा केल्या होत्या. त्यावेळी एबीने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रम मोडला होता. गांगुलीने 200 डावांमध्ये 8 हजार धावा ठोकण्याची कामगिरी 2002 साली बजावली होती. त्यापूर्वी विक्रमादित्य सचिन तेंडुलकरच्या नावे (210 इनिंग्ज) हा रेकॉर्ड होता. याचवर्षी दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम अमलाने कोहलीचा विक्रम मोडला होता. कोहलीने वनडे मध्ये 166 डावांमध्ये सात हजार धावा केल्या होत्या. अमलाने मात्र 150 इनिंग्जमध्येच ही कामगिरी बजावत सर्वात वेगवान 7 हजार धावा करण्याचा विक्रम रचला. विशेष म्हणजे अमलाने वन डे मध्ये सर्वात वेगवान 2 हजार, 3 हजार, 4 हजार, 5 हजार आणि 6 हजार धावा केल्या आहेत. 7 हजारचाही रेकॉर्ड तोडल्यानंतर कोहलीने रचलेला 8 हजारचा विक्रमही अमला मोडित काढणार का, हे लवकरच स्पष्ट होईल.