नाशिक : पहिल्याच पाण्यामध्ये नाशिककरांची दाणादाण उडाली. दीड तास मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पूर आला होता. आता या परिस्थितीला जबादार कोण असा प्रश्न विचारला जात आहे.

सराफ बाजारात रस्त्यांचा ओढा झाला. ओढ्यात गाड्या वाहून गेल्या. रिक्षा आणि टमटमलाही जलसमाधी
मिळाली. उत्तराखंडमधला प्रलय वाटावा अशी अवस्था नाशिकमधल्या गल्ल्याबोळांची झाली होती.

बुधवारच्या संध्याकाळी नाशकात दीड तासात 92 मिलीटमीटर पाऊस झाला आणि पावसाळ्याआधीच्या पालिकेच्या कामाची पोलखोलच झाली.

नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ, अनेक वाहनं वाहून गेली


दुसरा दिवस उजाडला... तेव्हा आदल्या दिवशीच्या प्रलयाच्या खुणा कायम होत्या. उरल्या सुरल्या गोष्टी सावरण्याचं काम सुरु होतं.

लगोलग महापौर रंजना भानसी यांनीही पाहणी केली आणि सगळा दोष निसर्गावर आणि प्लॅस्टिकवर टाकून त्या रिकाम्या झाल्या. नंतर बैठका झाल्या आणि अधिकाऱ्यांची कानउघडणीही केली.

नाशिक ही राज्यातली मेट्रो सिटी... झपाट्याने वाढणारं शहर... तीर्थक्षेत्र... पण अवैध बांधकामं, स्वच्छतेचा अभाव आणि अपुरी तयारी यामुळे नाशिक धोक्यात आलं आहे.

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत इथं सत्तांतर झालं. पण नव्या सत्ताधाऱ्यांवर टाकलेल्या
विश्वासाला या 90 मिलिमीटरच्या पावसानं धुवून काढलं. त्यामुळे नाशिकला प्रलयापासून वाचवायचं असेल, तर नुसते दोषारोप करुन चालणार नाहीत. सत्ताधाऱ्यांना थेट कामाला लागण्याची गरज आहे.