नवी दिल्ली : अखेर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची निवड जाहीर करण्यात आली आहे. टीम इंडियात रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीनं पुनरागमन केलं आहे.


बीसीसीआयच्या सीनियर निवड समितीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत 15 सदस्यीय भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली.

मात्र आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणारे काही खेळाडू का वगळण्यात आले, असा सवाल प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला. पण चांगल्या फॉर्मात असणाऱ्या पाच खेळाडूंचा स्टँड बाय यादीत समावेश करण्यात आला आहे.

भारताचा युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या 15 सदस्यीय भारतीय संघात स्थान मिळालेलं नसलं तरी या स्पर्धेसाठी राखीव खेळाडूंमध्ये त्याला स्थान मिळालं आहे.

त्याशिवाय मुंबईकर गोलंदाज शार्दूल ठाकूर तसंच दिनेश कार्तिक, सुरेश रैना आणि कुलदीप यादवचाही स्टँड बाय खेळाडूंमध्ये समावेश आहे.

भारताच्या पंधरा सदस्यीय संघातील एखाद्या खेळाडूला काही कारणास्तव माघार घ्यावी लागली, तर या स्टँड बाय खेळाडूंपैकी एकाला टीम इंडियात स्थान मिळू शकतं.

केवळ आयपीएलमधल्या कामगिरीच्या आधारे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खेळाडूंची निवड करता येणार नाही, असं निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी म्हटलं आहे.

संघनिवडीसाठी खेळाडूंचा अनुभव, गेल्या वर्षभरातली त्यांची कामगिरी आणि इंग्लंडमधलं वातावरण यांचा विचार करण्यात आल्याचंही प्रसाद यांनी सांगितलं.

चॅम्पियन्स ट्रॉफी : धोनीच्या संघातील 8 खेळाडू कोहलीच्याही संघात!

टीम इंडियानं 2013 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंडमध्येच चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं होतं. आता विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघासमोर आपलं विजेतेपद कायम राखण्याचं आव्हान असेल. धोनीच्या त्या संघातील आठ खेळाडू विराटच्या टीममध्येही खेळताना दिसतील.

धोनी आणि विराटशिवाय शिखर धवन, रोहित शर्मा, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादवनंही 2013 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

संधी न मिळालेले खेळाडू

सुरेश रैना, ईशांत शर्मा, दिनेश कार्तिक, अमित मिश्रा, इरफान पठाण, मुरली विजय, विनय कुमार हे खेळाडू 2013 च्या  चॅम्पियन्स ट्रॉफी संघात होते, मात्र त्यांना यंदा कोहलीच्या संघात स्थान मिळालं नाही.

संबंधित बातम्या :

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर


चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संदीप पाटील यांनी निवडलेला संघ


चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर


चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वीरेंद्र सेहवागची टीम!