ICC Champions Trophy 2025: गेल्या महिन्यात पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानचे (India vs Pakistan) संघ एकमेकांना भिडले होते. आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (ICC Champions Trophy 2025) पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. पुढील वर्षी होणारी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेचे वेळापत्रकही तयार केले आहे. परंतु भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.


बीसीसीआयने भारताचे सामने दुबई किंवा श्रीलंकेत आयोजित करण्याची मागणी आयसीसीकडे केली होती. भारताच्या या मागणीनंतर पाकिस्तान चांगलाच संतापलेला होता. पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात यावे, त्यांचे चांगले स्वागत होईल. त्यांना पाकिस्तानात प्रेम मिळेल, अशी विधानं केली होती. पंरतु बीसीसीआयने भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचं स्पष्ट सांगितल्याची माहिती मिळत आहे. यानंतर आयसीसी या स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेलमध्ये करणार आहे. तर टीम इंडिया आपले सामने दुबईत खेळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.


आयसीसीने बीसीसीआयसोबत केली चर्चा-


आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत बीसीसीआयशी चर्चा केली होती. पण बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला होता. टीम इंडियाचे सामने दुबई किंवा श्रीलंकेत व्हावेत, असे बीसीसीआयने म्हटले आहे. त्यामुळे यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेल अंतर्गत होऊ शकते. टीम इंडियाचे सामने दुबईत होऊ शकतात. कराची आणि दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आणखी सामने खेळवले जाऊ शकतात. काही सामने लाहोर आणि रावळपिंडी येथेही होऊ शकतात. पण भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळता येतील. याआधी टीम इंडिया आशिया कपसाठी पाकिस्तानलाही गेली नव्हती. भारतीय संघ श्रीलंकेत सर्व सामने खेळला.


आशिया चषकासाठी बीसीसीआयने दिला होता नकार-


गेल्या वर्षी आशिया चषक 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आला होता, ज्याचे आयोजन पाकिस्तानने केले होते, परंतु भारताने तेथे खेळण्यास नकार दिला होता. याच कारणामुळे भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत झाले. यावेळीही असेच काही घडण्याची अपेक्षा आहे. 


चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात


आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये एकूण 8 संघटना सहभागी होणार आहेत. यजमान असल्याने पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरला असता. 2023 एकदिवसीय विश्वचषकाचे यजमान देश सोडून इतर आयसीसी क्रमावारीतल अव्वल 7  संघांना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरल्या असत्या. यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे.


संबंधित बातमी:


ICC Champions Trophy 2025: 'टीम इंडिया पाकिस्तानात...'; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बीसीसीआयचा नकार, वसीम अक्रमचं मोठं विधान