लंडन: विराट कोहलीची टीम इंडिया आणि एबी डिव्हिलियर्सची दक्षिण आफ्रिका लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर उद्या (रविवार) आमनेसामने उभ्या ठाकणार आहेत. एक चॅम्पियन्स ट्रॉफीची गतविजेती फौज, तर दुसरी आयसीसी क्रमवारीतली नंबर वन टीम. या दोन्ही संघांसमोर उद्याच्या सामन्यात मोठी रंजक परिस्थिती आहे. जो जिंकला त्याला उपांत्य फेरीचं तिकीट, पण जो हरला त्याचं चॅम्पियन्स ट्रॉफीतलं आव्हानच संपुष्टात येणार आहे. एकप्रकारे भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधला हा सामना म्हणजे उपांत्यपूर्व फेरीचा सामना आहे.
उमेश यादवच्या चेंडूवर अँजेलो मॅथ्यूजनं घेतलेल्या याच एकेरी धावेनं श्रीलंकेला टीम इंडियाचा 321 धावांचा डोंगर ओलांडून दिलाच, पण चॅम्पियन्स ट्रॉफीत कमबॅक करण्याची संधीही मिळवून दिली.
श्रीलंकेकडून झालेल्या पराभवानं टीम इंडियाची मात्र पंचाईत केली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचं तिकीट विराट कोहलीच्या हातून अलगद निसटलं. आता ते तिकीट पुन्हा मिळवायचं तर आयसीसी क्रमवारीतल्या नंबर वन दक्षिण आफ्रिकेला हरवण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे.
वन डे क्रिकेटच्या मैदानात सामन्याच्या दिवशी सर्वोत्तम खेळ करणारा संघ जिंकत असतो, हे कितीही खरं असलं, तरीही दक्षिण आफ्रिकेला हरवणं सोपं नाही. आयसीसीच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिका आज नंबर वन आहे. भारताच्या गटातल्या पाकिस्तान आणि श्रीलंका संघांच्या तुलनेत अनुभव आणि गुणवत्ता या दोन्ही आघाड्यांवर दक्षिण आफ्रिकेचा संघ अधिक बलाढ्य आहे. पण श्रीलंकेविरुद्धच्या एका पराभवानं टीम इंडियासमोर त्याच दक्षिण आफ्रिकेला हरवण्याचं आव्हान उभं राहिलं आहे.
दक्षिण आफ्रिकेला हरवा आणि उपांत्य फेरीचं तिकीट मिळवा, हे आहे टीम इंडियासाठीचं समीकरण. अर्थात दक्षिण आफ्रिकेसाठीही परिस्थिती काही वेगळी नाही. पाकिस्तानकडून स्वीकारलेल्या पराभवामुळं दक्षिण आफ्रिकेलाही आता भारताला हरवल्याशिवाय पर्याय नाही. टीम इंडियाला हरवा आणि उपांत्य फेरीचं तिकीट मिळवा, हे आहे दक्षिण आफ्रिकेसाठीचं समीकरण.
थोडक्यात काय, तर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही फौजांसाठी ओव्हलवरची लढाई म्हणजे ‘करो या मरो’ची स्थिती आहे. साहजिकच हा सामना विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या कर्णधारांच्या मानसिक कणखरतेची कसोटी ठरावा. विराटच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीत तो सर्वोच्च स्तरावर पहिल्यांदाच मानसिक कणखरतेच्या कसोटीला सामोरा जाईल. डिव्हिलियर्सनं तर दक्षिण आफ्रिकेला वन डे क्रिकेटमध्ये सर्वोच्च यश मिळवून देण्यासाठी कसोटी क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. त्यामुळं त्याच्यावरही स्वत:ला सिद्ध करण्याचं दडपण असेल. त्यात डिव्हिलियर्सचं अनफिट असणं त्याच्यावरचं हे दडपण आणखी वाढवतं.
विराट कोहलीची टीम इंडिया आणि डिव्हिलियर्सची दक्षिण आफ्रिका या दोन्ही फौजा फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर समतोल आहेत. क्षेत्ररक्षणात मात्र टीम इंडिया अजूनही थोडी कच्ची आहे, पण दक्षिण आफ्रिकेचं क्षेत्ररक्षण जगात अव्वल आहे. त्यामुळं कागदावर तरी दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड भासत आहे.
कागदावर लय भारी असलेल्या दक्षिण आफ्रिकेला मैदानावर हरवायचं, तर विराट कोहलीला रवीचंद्रन अश्विन नावाचं अस्त्र वापरावंच लागणार आहे. अश्विनला न खेळवताच पाकिस्तानला हरवलं म्हणून, विराटनं त्याला ड्रेसिंगरूम नावाच्या कोल्ड स्टोरेजमध्येच ठेवलं. श्रीलंकेविरुद्ध त्याचा परिणाम काय झाला हे आपण पाहिलं. धनुष्का गुणतिलका आणि कुशल परेरासारख्या डावखुऱ्या फलंदाजांना रोखण्यासाठी टीम इंडियाच्या हाताशी रवीचंद्रन अश्विन हे ऑफ स्पिनचं हुकुमी अस्त्र नव्हतं. त्यामुळं श्रीलंकेनं 11 ते 40 या तीस षटकांत केवळ दोन विकेट्स गमावून 203 धावांचा रतीब घातला. भारतीय डावात त्याच कालावधीत तीन विकेट्सच्या मोबदल्यात 170 धावांचीच भर पडली होती. इथंच सामन्याचा निकाल श्रीलंकेच्या बाजूनं झुकला.
श्रीलंकेविरुद्धच्या लढाईत अश्विनला वगळण्याची झालेली ती चूक विराटला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढाईत सुधारण्याची संधी आहे. डिव्हिलियर्सच्या या फौजेत क्निन्टॉन डी कॉक, जेपी ड्युमिनी आणि डेव्हिड मिलर असे तीन तीन डावखुरे फलंदाज आहेत. त्यामुळं त्यांना रोखण्यासाठी अश्विनचा ऑफ स्पिन विराटच्या भात्यात असायलाच हवा. आता अश्विनसाठी भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमरा यांच्यापैकी कुणाला वगळायचं, हे त्यानं अनिल कुंबळेच्या सल्ल्यानं ठरवावं. विराटला नको असला तरी कुंबळे टीम इंडियाचा अजूनही मुख्य प्रशिक्षक आहे.