मुंबई : शशांक मनोहर यांनी मंगळवारी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, मात्र त्यामागचं कारण स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे मनोहर यांच्या राजीनाम्यावरुन उलटसुलट चर्चा सुरु आहेत. मनोहर यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडण्यात आल्याचे 'मिड डे' वृत्तपत्रात म्हटलं आहे.


 
आयसीसीच्या चेअरमनपदाची निवडणूक लढवता यावी यासाठी मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी म्हटलं होतं. पण मिड डे वृत्तपत्रातील बातमीनुसार मनोहर यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडण्यात आलं.

 

 

मनोहर यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही, मात्र 'सध्याच्या परिस्थितीत मी अध्यक्ष म्हणून काम करु शकत नव्हतो. मला इतरांच्या प्रभावाखाली नाही, तर माझ्या तत्त्वांनुसार बोर्डाचा कारभार चालवायचा होता आणि माझी प्रतिमा मलिन होऊ द्यायची नव्हती' असं मनोहर यांनी म्हटल्याचं या वृत्तात मांडलं आहे.

 
एक राज्य एक मत, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना क्रिकेट बोर्डापासून दूर ठेवणं, बेटिंगला वैधता देणं यासारख्या लोढा समितीच्या शिफारसी पाळण्यास बीसीसीआय नाखुश असल्याचं चित्र होतं. याच पार्श्वभूमीवर मनोहर यांनी दिलेला राजीनामा सर्वांच्या भुवया उंचावणारा होता.