लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीतही नाणेफेकीचा कौल विराट कोहलीच्या बाजूने लागलाच नाही. इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटने सलग पाचव्यांदा नाणेफेक जिंकली. पाचव्या कसोटीतही त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.


याही कसोटीत नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने न लागल्याने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली. कोहली म्हणाला, "मला वाटतंय, आता दोन्ही बाजूला छापा (हेड्स) असलेल्या नाण्याची गरज आहे, तरच मी टॉस जिंकू शकेन"

बॉलिवूड सिनेमात गाजलेल्या शोले सिनेमात ज्याप्रमाणे अमिताभ बच्चनकडे दोन्ही बाजूला एकच छाप असलेला कॉईन होता, तसाच कॉईन आज माझ्याकडे हवा होता, अशा अर्थाने कोहलीने प्रतिक्रिया व्यक्त केली. अर्थात कोहलीने प्रत्यक्षात शोलेचा उल्लेख केला नाही, पण नाण्याच्या दोन्ही बाजूला एकच छाप म्हणजे शोले हे समीकरण आपण पाहिलं आहे.

कोहलीची ही प्रतिक्रिया खूप काही सांगून गेली. या कसोटी मालिकेत एकदाही नाणेफेकीचा कौल कोहलीच्या बाजूने लागला नाही. कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेक किती महत्त्वाचं असतं, हे जाणकारांना वेळोवेळी सांगितलं आहे. त्याचा थेट परिणाम संघाच्या कामगिरीवर आणि पर्यायाने निकालावर होतो. त्यामुळेच कोहलीने आजच्या नाणेफेकीनंतर हतबलता व्यक्त केली.


इंग्लंडची प्रथम फलंदाजी

भारत आणि इंग्लंड संघांमधल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं याही कसोटीत टीम इंडियासमोर चौथ्या डावात फलंदाजी करण्याचं आव्हान असेल. या कसोटीसाठी हार्दिक पंड्याऐवजी हनुमा विहारीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. तसंच ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विनऐवजी डावखुरा स्पिनर रवींद्र जाडेजाची भारताच्या कसोटी संघात निवड करण्यात आली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा हनुमा विहारी हा भारताचा 292 वा क्रिकेटर ठरला आहे.

कोण आहे हनुमा विहारी?

हैदराबादच्या 24 वर्षीय हनुमा विहारीने दमदार कामगिरी केली आहे, ज्याच्या बळावर त्याला भारतीय संघात संधी मिळाली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 59.79 च्या सरासरीने 5142 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 15 शतकं आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या 

पृथ्वी शॉला संधी नाहीच, हनुमा विहारीचं कसोटी पदार्पण