वटपौर्णिमेला 13 चेन स्नॅनिंगच्या घटना, सव्वा दोन महिन्यांनी चोरांना बेड्या
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 07 Sep 2018 12:44 PM (IST)
वटपौर्णिमेला पुण्यात तब्बल 13 साखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या.
पुणे : पुण्यात वटपौर्णिमेला घडलेल्या साखळी चोरीच्या घटनेनंतर सव्वा दोन महिन्यांनी या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. मुजम्मील खान आणि मोहसीन शेख अशी या साखळी चोरांची नावं आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे जेवढ्या दागिन्यां चोरी झाली होते, ते सगळे दागिने चोरट्यांकडून जप्त केल्याचं पोलिसांनी सांगितलं. वटपौर्णिमेला पुण्यात तब्बल 13 साखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. वटपौर्णिमेला महिला वडाची पूजा करण्यासाठी नटूनथटून, दागिने घालून घराबाहेर पडतात. त्याचाच फायदा घेत पुण्यातील शिवाजीनगरमध्ये दोन, चतुश्रुंगीमध्ये दोन, सांगवीमध्ये चार, लष्करमध्ये एक, चतु:श्रुंगीमध्ये एक, वाकडमध्ये एक, कोंढवामध्ये एक आणि भारती विद्यापीठ परिसरात एक, अशा एकूण 13 चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या होत्या. वटपौर्णिमेच्या निमित्ताने सजून बाहेर पडलेल्या महिलांच्या अंगावरील दागिने लांबवण्याचा सपाटा दोन बाईकस्वारांनी लावला होता. पुणे शहराच्या विविध भागात एकामागोमाग एक साखळी चोरीच्या घटना घडू लागल्याने एकच खळबळ उडाली होती. दागिने चोरण्यासाठी वापरलेली दुचाकी कॅम्प भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने या चोरीचा उलगडा झाला. अखेर पोलिसांना सव्वादोन महिन्यांनी या चोरट्यांना पकडण्यात यश आलं आहे.