टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला की, "बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी माझ्या नावाची उगाचच चर्चा सुरु आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षाच्या रुपात मी एकच वर्ष पूर्ण केलं आहे. आणखी दोन वर्ष शिल्लक आहेत. मी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा दावेदार नाही."
दरम्यान, लोढा समितीच्या शिफारशीनंतर सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना पदावरुन हटवलं आहे. तर अजय शिर्के यांनाही पायउतार व्हावं लागलं.
गांगुलीमध्ये बीसीसीआयची धुरा सांभाळण्याची क्षमता : गावसकर
"बीसीसीआयकडे खूप काही करण्याची क्षमता असून बीसीसीआयची भूमिकाही मोठी आहे. त्यामुळे या पदासाठी सौरव गांगुली हेच नाव कायम माझ्या मनात येतं," असं सुनील गावसकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यानंतर बीसीसीआय अध्यक्षपदासाठी सौरव गांगुलीच्या नावाची चर्चा सुरु झाली.
गावसकर यांनी 1999-2000 सालचं उदाहरणही दिलं. "त्या काळात जेव्हा टीमवर मॅच फिक्सिंगचं संकट होतं तेव्हा गांगुलीकडे कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आणि त्याने सर्व काही बदलून दाखवलं," असं गावसकर म्हणाले.