मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली जाहिरात विश्वातील सर्वात मोठा ब्रँड आहे. भारतासह परदेशातही त्याचे चाहते आहेत. इंस्टाग्रामवर दीड कोटी, ट्विटरवर दोन कोटी आणि फेसबुकवर 3 कोटी 6 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.


खेळाडू खेळात सारखे व्यस्त असले तरी ते त्यांचा सोशल मीडिया सांभाळण्यासाठी एजन्सीची नियुक्ती करतात. फोर्ब्सच्या एका रिपोर्टनुसार, विराट कोहली हा जगातला सर्वात महागडा खेळाडू आहे, ज्याला एका इंस्टाग्राम पोस्टचे 3.2 कोटी रुपये मिळतात.

फोर्ब्स मासिकाच्या अहवालानुसार विराट भारतातील सर्वात श्रीमंत खेळाडू आहे. ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत त्याने प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू लायनल मेस्सीलाही मागे टाकलं आहे. बीसीसीआयच्या कराराव्यतिरिक्त तो जाहिरातींमधूनही कोट्यवधी रुपये कमावतो.

कर्णधारपदाची धुरा सांभाळल्यापासून कोहलीने अनेक विक्रम नावावर केले आहेत. त्याने आतापर्यंत खेळलेल्या दहापैकी 8 मालिकांमध्ये विजय मिळवला आहे. एका मालिकेत पराभव झाला, तर एक मालिका अनिर्णित राहिली.

सर्वाधिक वन डे शतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही तो दुसऱ्या स्थानावर आला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला मागे टाकत त्याने हे स्थान काबिज केलं. सध्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याच्या पुढे आहे.