खरंतर उपासाच्या पदार्थाच्या यादीत कदाचित सगळ्यात शेवटी समावेश झालेला साबुदाणा साधारणत: 1940 च्या आसपास पोर्तुगालमधून फिरत भारतात आला. अशा साबुदाण्याला भारतीयांनी थेट आपल्या उपासाच्या पानात मानाचं स्थान मिळणं म्हणजे, बिगर मानांकित बोरीस बेकरला थेट विम्बल्डनमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळण्यासारखं होतं. पण त्या बोरीस बेकरच्या विम्बल्डनमधल्या एंट्रीसारखाच 'साबुदाणा' इथे आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं!
आत्ताच्या घडीला तामिळनाडूमध्ये सेलमच्या 600-700 कारखान्यात तयार होणारा साबुदाणा भारतात आणि भारताच्या बाहेरही पाठवला जातो. पण तामिळनाडूच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या महाराष्ट्रातील साधारण कुठल्याही घरात लहान-थोर मंडळींना सर्वात जास्त आवडणारा पदार्थ विचारलात तर बहुमताने पहिलं नाव साबुदाण्याच्या खिचडीचं ऐकू येईल इतपत खात्री खिचडीबद्दल देता येते.
मला स्वतःला खिचडी अतिशय प्रिय असली तरी पुण्यात (स्वतःच्या आणि काही मित्रांच्या ) घरची सोडून साबुदाणा खिचडी फार कमी ठिकाणांची आवडलेली आहे, हे मात्र थोडंस नाईलाजाने सांगायला लागतं. कारण घेतला कुठलाही साबुदाणा, दिली फोडणी की झाली खिचडी; असं करायला ती म्हणजे बटाट्याची कोरडी भाजी नाही.
मुद्दाम ठराविक दुकानातून आणलेल्या साबुदाण्याला रात्री झोपायच्या आधी आठवणीने भिजत घालून त्याला सकाळी तूप जिऱ्याची खमंग फोडणी देऊन, त्यात त्या घरच्या विशिष्ट चवीला अनुरुप हिरव्या, पोपटी मिरच्यांचे तुकडे, चवीप्रमाणे त्यात खरपूस भाजलेले, कधी बदल म्हणून उकडलेले शेंगदाणे घातलेली, शेवटच्या वाफेच्या आधी त्यावर माफक मीठ आणि ताजं ओलं खोबरं सगळीकडे समान पसरुन केलेली खिचडी. जोडीला मधूनच घोट घ्यायला मोठा वाडगाभर गोड दही (ओहोहो) किंवा घुसळलेलं ताजं ताक. निदान अस्सल मराठी खवैयांसाठी तरी याची सर येणारा कुठला पदार्थ असेल, असं मला वाटत नाही. निदान महाराष्ट्रात तरी साबुदाणा खिचडी उपासाच्या पदार्थांमधला 'सरताज' आहे असं मानायला हरकत नाही.
विदर्भात ह्याच साबुदाण्याच्या खिचडीची 'साबुदाण्याची उसळ' होते. नगरपासून पुढे मराठवाड्यात बहुतेक जण हिरव्या मिरचीऐवजी लाल तिखट घालून खिचडी करतात. कोल्हापुरात गेलेलो असताना, कोणताही उपास नसल्याने एका माऊलींनी मुद्दाम कांदा घालून केलेली अफलातून चवीची खिचडी मी चाखली होती.
पुण्यातली आठवण सांगायची झाली तर साधारण 2000 सालापर्यंत पुण्यातल्या नामवंत हॉटेलात रोज खिचडी मिळणं हे पुणेकरांच्या शब्दात मंडईतल्या त्यावेळेच्या दुर्गा किंवा आसरामध्ये अळूचं फदफदं मिळण्यायेवढ दुरापास्त होतं.
साबुदाणा खिचडी ही फक्त महादेवराव, दत्तगुरु आणि हनुमंतरावांच्याच दिवशी बनवावी आणि विकावी हे पुण्यातले हॉटेल्स आणि स्नॅक्सवाले कुठल्या पोथीचे पारायण करुन शिकले होते ते त्याच देवांना ठाऊक. पण इतर दिवशी काही केल्या हे लोक साबुदाणा खिचडी द्यायचे नाहीत.
शनिपारजवळच्या श्री उपहार गृहाची खिचडी ही मला त्यावेळी त्यांच्या मिसळी एवढीच आवडायची, लक्ष्मी रोडवरच उपाध्यांचं जनसेवा, कुमठेकर रोड वरचं स्वीटहोम, त्याच्या अलीकडे पेशवाई ही हॉटेल्सही चांगली खिचडी मिळण्यासाठी प्रसिद्ध होतीच. यांना अनेकांना आम्ही सांगून थकलो पण कुठेही साबुदाणा खिचडी रोज मिळेल तर शप्पथ.
पण नंतर रस्त्यावर सुरु झालेल्या गाड्यांनी, टपऱ्यांनी माझ्यासारख्या पुणेकरांची सामुहिक गरज ओळखून साबुदाणा खिचडी रोज विकायला सुरु केली, त्यानंतर सगळ्या प्रसिद्ध हॉटेल्सवाल्यांनी एकेक करुन रोज पूर्णवेळ खिचडी द्यायला सुरु केली.
माझ्या आठवणीप्रमाणे 1990च्या आधी तुळशीबागेत लक्ष्मी रस्त्याच्या पोस्ट ऑफिसच्या बाजूला एक वयस्कर काका सकाळी डबे भरून पोहे, उपमा, शिरा आणि खिचडी विकायला यायला लागले. त्यावेळी पाच रुपयात एक प्लेट किंवा दोन पदार्थाची एक अशी मिक्स प्लेट मिळणाऱ्या त्या पदार्थांची, आसपास कॉटबेसिसवर राहणारे कॉलेजचे विद्यार्थी, कंपनीत बस, दुचाकीवर जाणारे लोक चातकासारखी वाट बघायचे. कागदी प्लेटमध्ये मिळणारी ती खिचडी खरोखर अफलातून चवीची असायची.
नंतर डेक्कनला बिपीन स्नॅक्स, बीएमसीसी रोडवरच्या 'प्रियदर्शनी' सारख्या अनेकांनी ही पद्धत अवलंबली. एवढेच नाही त्यावेळी खंडूजीबाबा चौकातले 'अपना घर' (लिंबाच्या वापरलेल्या फोडी एकत्र करून खताला वापरणारे) किंवा कुमठेकर रस्त्याला स्वीटहोमच्या मागे असलेले राहुल केटरर्स, सकाळ-संध्याकाळ दोन्हीवेळा ताजी खिचडी द्यायचे म्हणून पुणेकरांना अप्रूप वाटायचे वगैरे दिवस होते. आता असे जॉईट सकाळपासून संध्याकाळपर्यंत जागोजागी दिसत असतात, पण पुण्यात आजच्या घडीला तेवढी चांगली साबुदाणा खिचडी शोधणं हे अवघड काम आहे; हे हजारो पुणेकरांच्या अभिमानाला धक्का लावून मी नाईलाजाने पण खात्रीने सांगू शकतो.
याला डीएसके विश्व मधल्या 'मोरया' किंवा ,मेहेंदळे गॅरेजसारखे तुलनेनी नवीन झालेले सन्माननीय अपवाद अर्थातच आहेत.डेक्कनवरच्या एका क्लबच्या बाहेर व्यवसाय करणाऱ्या कँटीनची खिचडी आवडून 'घ्यायचा' मी कॉलेजच्या दिवसापासून अनेकवेळा प्रयत्न केला होता. पण तो सलमानच्या लफड्यांसारखा कायम असफल राहिला. ते कँटीन शेवटी बंद झालं. पण शेवटपर्यंत तिथली खिचडी काही मला आवडू शकली नाही.
शेवटी सलमानला आराध्याचं कौतुक करायला लागलं, तर जितपत चांगलं फिलिंग येईल, तितपत चांगल्या फिलिंगनी मी त्यांच्या 'बटाटावड्याचं' कौतुक करू शकतो. कृपया लक्षात घ्या, दोन्ही मागची भावना शुद्धच असते. पण इथे (उगाचच ओव्हरहाईप केलेल्या) त्या जागी ऐश्वर्यासमान साबुदाणा खिचडी कधीच चांगली न मिळाल्याचं दु:ख, 'बिइंग खवैय्या' म्हणून मला 'बिइंग ह्युमन' पेक्षाही जास्ती असतं.
तरीही तो ह्यूमन जसा ऐश्वर्या सोडून गेली म्हणून फार काळ दु:खी न रहाता, कॅटरीनाच्या, नंतर ती नाही मिळाली तर फरिया आलमच्या, तीही नाही मिळाली तर कुठल्याश्या लुलीया वांटूरच्या मागे फिरत रहातो, तद्वत मीही हार न मानता चांगल्या साबुदाणा खिचडीच्या शोधात फिरतच रहातो. कुठे दिसली तर मला भेटण्याचा निरोप आठवणीने सांगा!
संबंधित बातम्या
खादाडखाऊ : दिवाळीनंतरचे ‘ओरीजनल’ मराठी चटकदार पदार्थ
खादाडखाऊ : दिवाळीची खरेदी अन् पुण्यातील खवय्येगिरी!
खादाडखाऊ : अटर्ली बटर्ली पण फक्त डिलीशअस?
खादाडखाऊ : जखमा उरातल्या
खादाडखाऊ : चायनीज गाड्यांवरचे खाणे आणि अर्थकारण
वडापाव -काही आठवणीतले, काही आवडीचे
खादाडखाऊ : मराठी पदार्थांसाठी फक्कड
खादाडखाऊ : गणेशोत्सवातली खाद्यभ्रमंती आणि बदलत चाललेलं पुणं
खादाडखाऊ : गणेशोत्सव आणि मास्टरशेफ
खादाडखाऊ : पुण्यातला पहिला ‘आमराई मिसळ महोत्सव’
खादाडखाऊ : खाद्यभ्रमंती मुळशीची
खादाडखाऊ : मंदारची पोह्यांची गाडी
खादाडखाऊ : आशीर्वादची थाळी
खादाडखाऊ : पुण्यातील महाडिकांची गाडी
खादाडखाऊ : पुन्हा एकदा लोणावळा
खादाडखाऊ : ‘इंटरव्हल’ भेळ आणि जय जलाराम
खादाडखाऊ : ‘तिलक’चा सामोसा सँपल
खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा
ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी
खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’!
खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा