मुंबई: यंदा पहिल्यांदाच दक्षिण अमेरिकेत ऑलिम्पिकचं आयोजन केलं जातंय. 5 ते 21 ऑगस्ट दरम्यान ब्राझिलच्या रिओ डी जनैरोमध्ये 33 ठिकाणी ऑलिम्पिकच्या क्रीडास्पर्धांचं आयोजन केलं जाणार आहे. तसेच साओ पावलो, बेलो हॉरिझोन्टे, साल्वाडोर, ब्राझिलिया आणि मेनॉजमध्ये ऑलिम्पिकच्या काही स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत.

 

ऑलिम्पिकमध्ये किती देशांचा सहभाग?

रिओ ऑलिम्पिकमध्ये यंदा एकूण 206 देशांचे जवळपास 10,500 अॅथलिट्स सहभागी होतील. यंदा ऑलिम्पिकमध्ये 28 क्रीडाप्रकारांचा समावेश असून, 306 स्पर्धांत सुवर्णपदकं पणाला लागली आहेत. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये रग्बी आणि गोल्फ या नव्या खेळांचा समावेश करण्यात आलाय.

 

सर्वसामावेशक ऑलिम्पिक

जगभरातील सर्वांना खेळांच्या माध्यमातून एकत्र आणणं हे ऑलिम्पिक मोहीमेचं मूळ उद्दीष्ट आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं यंदा ऑलिम्पिकमध्ये निर्वासितांच्या टीमचाही समावेश केला आहे. निर्वासितांच्या संघात दक्षिण सुदान, सीरिया, काँगो आणि इथियोपियाच्या मिळून एकूण दहा निर्वासित खेळाडूंचा समावेश आहे.

 

 

रिओ ऑलिम्पिकमध्ये टीम इंडिया

भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये तिरंगा डौलानं फडवण्याच्या उद्देशाने रिओ डी जनैरोमध्ये दाखल झाल्या आहेत. ऑलिम्पिकमध्ये भारताचं हे आतापर्यंतचं सर्वात मोठं पथक ठरलंय. भारताकडून 15 क्रीडा प्रकारात एकूण 119 खेळाडू सहभागी होणार आहेत.

 

याआधी 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताकडून 83 खेळाडूंचं पथक सहभागी झालं होतं. भारतानं लंडन ऑलिम्पिकमध्ये एकूण सहा पदकं मिळवली होती. त्यात दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश होता. यंदा टीम इंडिया तो आकडा पार करणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.