नवी दिल्ली : दोन व्यक्तींमधल्या मतभिन्नतेला वाद म्हणता येणार नाही, असा युक्तीवाद टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केला आहे. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यामधल्या कथित वादाच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर शास्त्री यांनी हे उत्तर दिले आहे.

इंग्लंडमधल्या विश्वचषकादरम्यान विराट-रोहित वादाच्या आलेल्या बातम्या निखालस खोट्या होत्या, असं शास्त्री यांनी म्हटलं होतं. गल्फ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री यांना तोच प्रश्न पुन्हा विचारण्यात आला. त्यावर शास्त्री म्हणाले की, एका संघामधल्या 15 खेळाडूंत प्रत्येक वेळी एकमत होतंच असं नाही. अनेकदा त्यांच्यात मतभिन्नता आढळून येते. याचा अर्थ असा नाही की, त्यांच्यात वाद आहेत.

रवी शास्त्री म्हणाले की, कोहली आणि रोहितमध्ये वाद असते, तर संघाची आणि त्या दोघांची कामगिरी इतकी चांगली झाली नसती. विश्वचषक स्पर्धेत रोहितने पाच शतकं ठोकली नसती. मागील पाच वर्षांपासून मी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुमचा सदस्य आहे. मी सर्व खेळाडूंना जवळून पाहात आहे. मला कधीच कोणामध्ये वाद आहेत, असं जाणवलं नाही.

टीम इंडियात कोणतेही मतभेद नसल्याचा विराट कोहलीचा दावा