मुंबई : महापरीक्षेद्वारे (महापोर्टल) जून-जुलै 2019 मध्ये वनविभागाच्या वनरक्षक या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर 4 सप्टेंबरला निवड झालेल्या उमेदवारांची धावण्याची चाचणी घेण्यात आली. यामध्ये अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची निवड केल्याचा प्रकार समोर आल्याचे सांगून ही निवडप्रक्रिया पारदर्शी नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.


औरंगाबाद प्रादेशिक वनविभागाची रिक्त पदे भरण्यासाठी घेण्यात आलेल्या धावण्याच्या चाचणीदरम्यान हा गोंधळ पाहायला मिळाला. धावण्याची चाचणी सुरु झाल्यानंतर चाचणी देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार निवड झालेल्या 2 विद्यार्थ्यांकडे गरजेची कागदपत्रं नसल्याकारणाने त्यांना बाजूला करण्यात आले. अटेन्डन्स शिटवर त्यांना अनुपस्थित दाखवून त्यांची परीक्षा घेतली गेली नाही.

त्यानंतर त्यांची धावण्याची चाचणी त्याच दिवशी अखेरीस घेऊन त्याची वेळ त्यामध्ये चुकीची नोंद केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे ही निवड चाचणी घोटाळ्यात सापडल्याचे समोर आले आहे.

एका शिटमध्ये अनुपस्थित दाखवून दुसऱ्या शिटमध्ये उपस्थित दाखवून त्यांची निवड केल्यामुळे विद्यार्थ्यांनी याबाबत चौकशीची मागणी केली आहे. हा महापोर्टलचा सावळा गोंधळ थांबावा यासाठी प्रशासनाने पाऊलं उचलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.