मुंबई:  टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठीची शर्यत अखेर भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेनं जिंकली. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी धरमशालात घेतलेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळेच्या नावाची घोषणा केली.


 

सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या त्रिसदस्यीय सल्लागार समितीनं दिलेल्या अहवालानुसार कुंबळेची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी कुंबळेला एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे.

 

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयकडे एकूण 57 अर्ज आले होते. बीसीसीआयच्या पहिल्या छाननीतून त्यापैकी 21 अर्ज वैध ठरले होते. बीसीसीआयच्या सल्लागार समितीनं त्या 21 जणांमधून मोजक्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यात अनिल कुंबळेसह भारतीय संघाचे माजी टीम डायरेक्टर रवी शास्त्री, ऑस्ट्रेलियाचे टॉम मूडी, लालचंद राजपूत आणि प्रवीण अमरे यांचा मुख्य समावेश होता.

 

त्यापैकी अनिल कुंबळेच्या नावावर बीसीसीआयनं टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून शिक्कामोर्तब केलं आहे.

 

यापूर्वी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा 16 वर्षांपूर्वी भारतीयाने सांभाळली होती. कपिल देव हे 2000 साली टीम इंडियाचे प्रशिक्षक होते. त्यानंतर आता अनिल कुंबळेच्या रुपाने टीम इंडियाला भारतीय प्रशिक्षक मिळाला आहे.

 

2015 मध्ये झिम्बाब्वेच्या डंकन फ्लेचर यांचा करार संपल्यानंतर टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची जागा रिकामी होती. त्यादरम्यान रवी शास्त्री यांनी टीम इंडियाचे डायरेक्टर म्हणून धुरा सांभाळली.

संबंधित बातम्या

अनिल कुंबळे टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक


भारतीय क्रिकेटला 'अच्छे दिन' येणार : गावसकर


सचिन, सौरव आणि लक्ष्मण निवडणार टीम इंडियाचा कोच!