मुंबई: मुंबईत पावसानं चांगली हजेरी लावली आहे. मुंबईतल्या दादर आणि वरळी परिसरात रात्रभर पाऊस झाला. तर अंधेरी, जोगेश्वरी आणि गोरेगावसह पश्चिम उपनगरातही पाऊस झाला. त्यामुळं काही भागात पाणी साचलं.
सुदैवाने पावसामुळं कुठंही वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला नाही. सर्व वाहतूक सुरळीत सुरु आहे.
गुरुवारी सकाळी 8 पासून ते आज पहाटे 4 वाजेपर्यंत मुंबई शहरात 28.99 मिमी, पश्चिम उपनगरात 44.72 मिमी तर पूर्व उपनगरात 41.47 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
मराठवाड्यातही जोरदार पाऊस
गेले चार महिने दुष्काळ आणि उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेला मराठवाडा अखेर पावसाच्या दमदार एन्ट्रीनं सुखावला आहे.
ज्या लातुरात अवघ्या काहीच दिवसांपूर्वी रेल्वेनं पाणी पुरवण्यात आलं, त्या लातूरमध्ये सध्या सगळीकडे पाणीच पाणी दिसून येतंय. शहरातले रस्ते, बाजारपेठा सगळीकडे पाणीच पाणी जमा झालेलं पाहायला मिळालं.
जिल्ह्यातल्या औराद शहाजानी परिसरात केवळ 2 तासांत 90 मिमी पाऊस झाला. निलंग्यात 170 मिमी पाऊस झाला. उस्मानाबादेमधील तेरणा नदी गेल्या 15 वर्षात पहिल्यांदाच दुथडी भरुन वाहू लागली आहे. तर तिकडे औरंगाबादेतल्या सिल्लोड, चिंचोली आणि गारज परिसरात काल सलग दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस झाला. त्यामुळं आता पेरणीची लगबग दिसून येतेय.