मुंबई : हॉकी विश्वचषकातून यजमान टीम इंडियाच बाहेर पडली आहे. भुवनेश्वरमध्ये सुरु असलेल्या वर्ल्डकपमध्ये भारताचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आलं.
बलाढ्य हॉलंड संघाकडून या सामन्यात भारताने 2-1 अशी हार स्वीकारली. त्यामुळे 1975 सालानंतर हॉकी विश्वचषकावर पुन्हा आपलं नाव कोरण्याचं भारताचं स्वप्न अधुरं राहिलं. कलिंगा स्टेडियममध्ये जमलेल्या प्रेक्षकांच्या अपेक्षाही धुळीस मिळाल्या.
आकाशदीप सिंगनं या सामन्याच्या बाराव्या मिनिटालाच भारताला आघाडी मिळवून दिली होती. पण थिएरी ब्रिन्कमॅनने पंधराव्या मिनिटाला गोल करुन हॉलंडला बरोबरी साधून दिली. सामना संपण्यासाठी दहा मिनिटांचा अवधी असताना मिन्क वीरडननं गोल नोंदवून हॉलंडला निर्णायक आघाडी मिळवून दिली.
उपांत्य फेरीत हॉलंडची गाठ ऑस्ट्रेलिया संघाशी पडणार आहे. बेल्जियमने जर्मनीचा धुव्वा उडवून आधीच सेमी फायनलमधील स्थान पक्क केलं होतं. बेल्जियमचा सामना इंग्लंडशी होणार आहे.