भोपाळ : मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी कमलनाथ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसने पत्रकार परिषद घेत कमलनाथ यांच्या नावाची घोषणा केली. कमलनाथ यांनी मुख्यमंत्री पदासाठीचे दुसरे दावेदार ज्योतिरादित्य शिंदे यांचे आभार मानले आहेत.


मध्य प्रदेशमधील काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार यावर जोरदार चर्चा सुरू होत्या. दोन दिवसांपासून मध्य प्रदेश मुख्यमंत्रीपदाचा संघर्ष अखेर आता निवळला आहे. कमलनाथ यांचं नाव अखेर निश्चित करण्यात आलं आहे. येत्या 15 डिसेंबरला कमलनाथ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.


काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी बोलणी झाल्यानंतर शेवटी ज्येष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. दिल्लीतील हायकमांडच्या निर्णयानंतर हे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे.


निकालानंतर कमलनाथ गट आणि ज्योतिरादित्य शिंदे गट निर्माण झाले होते. ज्योतिरादित्य शिंदे समर्थकांना ज्योतिरादित्य मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आक्रमक झाले होते. मात्र हायकमांडच्या आदेशानंतर अखेर मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे.