भुवनेश्वर : हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेल्जियमने 'सडनडेथ'मध्ये नेदरलँड्सवर 3-2 असा विजय मिळवत हॉकी विश्वचषकात पहिले विजेतेपद पटकावले. रविवारी भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्येच पंचांनी निर्णय बेल्जियमच्या बाजूने दिला होता. पण नेदरलँड्सने रेफरल मागून बेल्जियमचे जगज्जेतेपद लांबवले. अशा परिस्थितीतही संयम दाखवून बेल्जियमने सडनडेथमध्ये बाजी मारून पहिले जगज्जेतेपद पटकावले.

निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये बेल्जियमकडून वॉन ओबेल फ्लोरेंट व वेगनेज व्हिक्टर यांनी गोल केले तर त्यांच्या वॉन ऑर्थर, डेनायेर फेलिक्स व डे स्लूवेर यांना गोल करण्यात अपयश आले. नेदरलँड्सकडून जेरॉन हर्ट्सबर्गर व जियुस जोन्स यांनी गोल केले. मिरको प्रुजर, वॉन सीव व वॉन थिस यांना गोल करता आला नाही. सामना सडनडेथवर गेल्यानंतर बेल्जियमच्या वॉन ओबेल याने गोल केला तर नेदरलँड्सच्या हर्ट्सबर्गरला गोल नोंदवता आला नाही.

स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत पोहोचलेल्या बेल्जियमने अंतिम सामन्यात बलाढ्य नेदरलँड्सला गोल करण्यापासून रोखले. ऑस्ट्रेलियाला पराभूत करत अंतिम फेरीत दाखल झालेल्या नेदरलँड्सला कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. दोन्ही संघांनी गोल करण्याच्या अनेक संधी गमावल्या.

मागील विश्वचषक स्पर्धेत बेल्जियम पाचव्या स्थानी राहिले होते. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या नेदरलँड्सला मागील देखील विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी
गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या स्थानासाठी  झालेल्या लढतीत इंग्लंडला 8-1 अशा मोठ्या फरकाने पराभूत केले. ऑस्ट्रेलियासाठी टॉम क्रेगने तीन, जेर्मी हेवार्डने दोन तर ब्लेक गोव्हर्स, ट्रेंट मिटॉन व टिम ब्रँड यांनी प्रत्येकी एक गोल केला. इंग्लंडतर्फे बॅरी मिडलटनने एकमेव गोल नोंदवला. ऑस्ट्रेलियाने नोंदवलेल्या आठ गोलपैकी पाच गोल मैदानी, तर तीन गोल पेनल्टी कॉर्नरवर झाले. विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध मागील 13 सामन्यांतील ऑस्ट्रेलियाचा हा 11 वा विजय ठरला.