नवी दिल्ली : राफेल विमान खरेदी प्रकरणी काँग्रेसने भाजपला घेरलेले असताना सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेपास नकार दिल्यानंतर भाजपला बळ मिळाले आहे. काँग्रेसला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि राफेल प्रकरणी म्हणणं मांडण्यासाठी भाजप देशभरात 70 पत्रकार परिषदा घेणार आहे. राफेल विमान खरेदी प्रकरणात काँग्रेसने कोंडी केलेल्या भाजपला सर्वोच्च न्यायालयात मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर काँग्रेसविरोधात भाजपनेही काँग्रेसविरोधात आक्रमक धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसरीकडे संसदेच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला आजपासून सुरुवात होणार आहे. आज संसदेत राफेलच्या मुद्द्यावरुन गोंधळ होण्याची शक्यता आहे. तसेच सरकार सुधारित तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मांडणार असण्याची शक्यता आहे.

देशभर गाजत असलेल्या राफेल विमानांच्या करारावर मौन बाळगून असलेल्या पंतप्रधान मोदींनीही मौन सोडलं आहे. रायबरेलीत बोलताना मोदींनी राफेल करारावरुन काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. खोटेपणा हाच काँग्रेसच्या राजकारणाचा पाया राहिला आहे. आधी संरक्षण मंत्रालयावर अविश्वास दाखवणाऱ्या काँग्रेसचा आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयावरही विश्वास राहिलेला नाही, असं मोदी म्हणाले.

फ्रान्ससोबतच्या राफेल विमानांच्या करारात मोदी सरकारनं भ्रष्टाचार केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयानं मात्र या प्रकरणात हस्तक्षेपास नकार देत करारावर शंका उपस्थित करणं अयोग्य असल्याची टिप्पणी दिलीय. काँग्रेस मात्र या कराराची जेपीसी अर्थात संसदेच्या संयुक्त समितीकडून चौकशी व्हावी या मागणीसाठी अडून बसली आहे.