चेन्नई : आयपीएलच्या इतिहासात यंदा चौथ्यांदा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या दोन तगड्या संघांमध्येच फायनल पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत अंतिम फेरीत जेव्हा या दोन संघांमध्ये सामने झाले, तेव्हा मुंबईचं पारडं जड राहिलं आहे. मात्र मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांनी तीन वेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. त्यामुळे यंदा आयपीएलची ट्रॉफी कोण उंचावणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
आयपीएलच्या अंतिम फेरीत मुंबई वि. चेन्नईचा इतिहास
2010, 2013 आणि 2015 अशा तीन वर्षी आयपीएच्या अंतिम फेरीत मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये सामना रंगला आहे. 2010 साली चेन्नईने मुंबईवर 22 धावांनी मात केली होती. चेन्नईने मुंबईला घरच्या मैदानावरच लोळवलं होतं.
2013 मध्ये कोलकात्यात झालेल्या अंतिम फेरीत मुंबईने चेन्नईवर 23 धावांनी विजय मिळवत वचपा काढला होता. त्यानंतर पुन्हा कोलकात्यातच 2015 साली झालेल्या आयपीएलच्या अंतिम फेरीत मुंबईने चेन्नईवर 41 धावांनी विजय मिळवला. यंदा हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये चेन्नई आणि मुंबई भिडणार आहेत.
आयपीएलच्या 12 पर्वांच्या इतिहासात चेन्नई सुपरकिंग्जनी सर्वाधिक वेळा म्हणजेच तब्बल आठ वेळा अंतिम फेरी गाठली आहे. तर मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे.
दरम्यान, धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जने विशाखापट्टणममधल्या क्वालिफायर टू सामन्यावर अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. चेन्नईने या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला.
चेन्नईच्या गोलंदाजांनी आधी दिल्ली कॅपिटल्सला वीस षटकांत 9 बाद 147 धावांत रोखलं होतं. पण चेन्नईच्या फॅफ ड्यू प्लेसी आणि शेन वॉटसननं 81 धावांची सलामी देऊन दिल्लीच्या आव्हानातली हवाच काढून घेतली. ड्यू प्लेसी आणि वॉटसन या दोघांनीही वैयक्तिक अर्धशतकं झळकावली. ड्यू प्लेसीने 39 चेंडूंत 50, तर वॉटसनने 32 चेंडूंत 50 धावांची खेळी उभारली. त्या दोघांनी रचलेल्या पायावर चेन्नईने विजयाचा कळस उभारला.
त्याआधी, या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने वीस षटकांत नऊ बाद 147 धावांची मजल मारली होती. दिल्लीचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत या सामन्यात आपल्या लौकिकाला पुन्हा जागला. पण समोरच्या एंडने तोडीची साथ न लाभल्याने त्यालाही सढळ हातांनी मोठे फटके खेळता आले नाहीत.
या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करुन दिल्लीला नऊ षटकांत तीन बाद 59 असं रोखलं होतं. त्या कठीण परिस्थितीत मैदानात उतरलेल्या रिषभ पंतने एक खिंड लावून धरली आणि दिल्लीची धावगती सातत्याने उंचावत ठेवली. त्याने 25 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकारासह 38 धावांची खेळी उभारली.
IPL Final | आयपीएलच्या अंतिम फेरीत मुंबई-चेन्नई भिडतात, तेव्हा काय होतं?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 May 2019 11:55 PM (IST)
2010, 2013 आणि 2015 अशा तीन वर्षी आयपीएच्या अंतिम फेरीत मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये सामना रंगला आहे. अंतिम फेरीत जेव्हा या दोन संघांमध्ये सामने झाले, तेव्हा मुंबईचं पारडं जड राहिलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -