मुंबई : रोहित शर्माच्या कर्णधारास साजेशा खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. मुंबई इंडियन्सचा हा सात सामन्यांमधला केवळ दुसरा विजय ठरला.


यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध घरच्या मैदानावर 7 एप्रिलला पराभव पदरात पडला. ही पराभवाची मालिका पुण्यातल्या सामन्यात संपली. मात्र मुंबई इंडियन्सचा इतिहास इतर संघांपेक्षा वेगळा आहे. सुरुवातीला सतत पराभव पत्करणारा हा संघ आतापर्यंत तीन वेळा आयपीएल चॅम्पियन ठरला आहे.

2008 आणि 2009

आयपीएलची सुरुवात झाली त्या पहिल्याच वर्षात मुंबई इंडियन्सकडे दिग्गज खेळाडू होते. मात्र सुरुवात निराशाजनक झाली. सनथ जयसूर्या, हरभजन सिंह, शॉन पोलॉक, लासिथ मलिंगा, सचिन तेंडुलकर यांच्यासारखे खेळाडू मुंबईकडे होते. मात्र सचिन तेंडुलकरला आयपीएलच्या अगोदरच दुखापत झाली, ज्यामुळे कर्णधारपद हरभजन सिंहकडे सोपवण्यात आलं. पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून मुंबईला पराभव पत्करावा लागला. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाज श्रीसंतच्या कानशिलात लगावल्यामुळे कर्णधार हरभजन सिंहचं निलंबन करण्यात आलं. त्यानंतर शॉन पोलॉककडे संघाची धुरा देण्यात आली. पहिल्या चार सामन्यांमध्ये मुंबईचा पराभव झाला. मात्र मुंबईने नंतरच्या सहापैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला. उर्वरित चार सामन्यांपैकी मुंबईला केवळ दोन विजयांची गरज होती. मात्र पुढील तीन सामन्यांमध्ये छोट्या फरकाने पराभव झाला आणि मुंबईला सेमीफायनलमध्ये स्थान मिळवता आलं नाही. सुरुवातीला सलग चार सामने गमावलेल्या मुंबईने गुणतालिकेत सात विजयांसह पाचवं स्थान मिळवलं.

लोकसभा निवडणुकांमुळे 2009 साली आयपीएल मालिका दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली. आशिष नेहरा, झहीर खान, शिखर धवन, रॉबिन उथप्पा यांसारख्या खेळाडूंचा मुंबईच्या ताफ्यात समावेश झाला होता. चेन्नई सुपरकिंग्जवर मात करत मुंबईने सुरुवात तर चांगली केली. मात्र ही लय कायम राखता आली नाही. मुंबईला 14 सामन्यांपैकी केवळ पाच विजय मिळवता आले.

2010, 2011 आणि 2012 साली दमदार सुरुवात

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 2010 साली कायरन पोलार्डसारख्या काही चांगल्या खेळाडूंचा समावेश झाला होता. या मोसमात मुंबईने चांगली सुरुवात केली. पहिल्या आठ सामन्यांपैकी मुंबईने सात विजय मिळवले आणि गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज केलं. सचिन तेंडुलकर, लासिथ मलिंगा, हरभजन सिंह, अंबाती रायुडू, सौरभ तिवारी हे खेळाडू त्या मोसमात चांगल्या फॉर्मात होते. मुंबईने उर्वरित सहा सामन्यांपैकी तीन विजय मिळवले आणि 20 गुणांसह गुणतालिकेत पहिलं स्थान मिळवलं. मात्र फायनलमध्ये चेन्नईकडून 22 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

मुंबई इंडियन्सने 2011 साली पहिल्या दहापैकी आठ सामन्यांमध्ये विजय मिळवला. त्यानंतर सलग तीन पराभव स्वीकारावे लागले आणि अखेरच्या सामन्यात विजय मिळवला. एलिमिनेटरमध्ये मुंबईचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी झाला. कोलकात्याचा पराभव केल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई यांच्यात सामना झाला. मात्र बंगळुरुविरुद्ध मुंबईचा पराभव झाला.

दरम्यान, 2011 साली मुंबई इंडियन्सने चॅम्पियन्स लीग टी-20 च्या फायनलमध्ये विजय मिळवला होता.

2012 सालच्या आयपीएल मोसमात मुंबई इंडियन्सला दुखापतीचं ग्रहण लागलं. सचिन तेंडुलकर कर्णधारपदावरुन पायउतार झाला आणि हरभजन सिंहकडे संघाची धुरा देण्यात आली. सचिनला दुखापतीमुळे चार सामन्यांना मुकावं लागलं. पहिल्या आठपैकी चार सामन्यांमध्ये मुंबईने विजय मिळवला. तर नंतरचे आठपैकी सहा सामने मुंबईने जिंकले आणि चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध एलिमिनेटरसाठी संघ पात्र ठरला. मात्र एलिमिनेटरमध्ये चेन्नईकडून मुंबईचा 38 धावांनी पराभव झाला.

2013 साली पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान

रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सने 2013 साली पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. मुंबईच्या 2013 सालच्या आयपीएल मोसमाची सुरुवात पराभवाने झाली. मात्र नंतर मुंबईने कामगिरीत सुधारणा करत फायनलपर्यंत मजल मारली आणि विजय मिळवला.

याच वर्षी मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा चॅम्पियन्स लीग टी-20 चा खिताब जिंकला.

2014 साली निराशाजनक सुरुवात

यूएईमध्ये खेळवण्यात आलेल्या 2014 च्या आयपीएल मोसमात मुंबई इंडियन्सची सुरुवात निराशाजनक झाली. या मोसमात पहिल्या पाचपैकी पाच सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा दारुण पराभव झाला. मात्र त्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर मात करत मुंबईने कमबॅक केलं. या मोसमात मुंबईने 14 पैकी सात सामन्यांमध्ये विजय मिळवला आणि एलिमिनेटरपर्यंत मजल मारली. एलिमिनेटरमध्ये मुंबईचा चेन्नईकडून पराभव झाला होता.

2015 साली पुन्हा चॅम्पियन

मुंबई इंडियन्सने 2015 साली पुन्हा एकदा आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. या मोसमात मुंबईने 14 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला, तर सहा पराभव स्वीकारावे लागले आणि गुणतालिकेत दुसरं स्थान मिळवलं.

2016 साली पराभवाने सुरुवात

या मोसमात मुंबई इंडियन्सची सुरुवात पराभवाने झाली. सुरुवातीच्याच सामन्यात रायझिंग पुणे सुपरजायंट्सने मुंबईवर 9 विकेट्स राखून मात केली होती. मात्र त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सवर मात करत मुंबईने खातं उघडलं. या मोसमात मुंबई इंडियन्सने सात सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. मात्र पाचव्या स्थानावर असल्यामुळे मुंबईचा संघ एलिमिनेटरसाठी अपात्र ठरला.

2017 साली तिसऱ्यांदा चॅम्पियन

या मोसमातही मुंबई इंडियन्सची सुरुवात पराभवाने झाली. सुरुवातीच्याच सामन्यात रायझिंग पुणे सुपरजायंट्सने मुंबईवर 7 विकेट्स राखून मात केली होती. त्यानंतर सलग सहा सामन्यांमध्ये मुंबईने विजय मिळवला, मात्र पुन्हा एकदा पुण्याने मुंबईचा विजयरथ रोखला. पण अटीतटीच्या अंतिम लढतीत मुंबई इंडियन्सने पुण्यावर मात केली आणि तिसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. या मोसमात मुंबईने 14 सामन्यांपैकी 10 विजय मिळवले होते.