पुणे : वन डे क्रिकेटमध्ये भारताने साडेतीनशेहून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे. विशेष म्हणजे केवळ दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन संघांनीच साडेतीनशेहून अधिक धावांचा पाठलाग करून विजय साजरा केलाय.

यापूर्वी भारताने 2013 साली नागपूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 351 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यानंतर आता दुसऱ्यांदा भारताने साडेतीनशेपेक्षा जास्त धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला आहे.

वन डेत सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे. दक्षिण आफ्रिकेने 2006 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 438 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

दुसऱ्या सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रमही दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे. 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 372 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने शानदार विजय साजरा केला होता.

भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोनच संघ असे आहेत, ज्यांनी साडेतीनशेपेक्षा जास्त धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला आहे. न्यूझीलंडने 2007 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 350 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. तर इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध 2015 मध्ये 350 धावांचं लक्ष्य गाठलं होतं.