सोलापूर : सोलापुरातील एका अवलियाने विविध मागण्यांसाठी अनोखं आंदोलन केलं आहे. पुणे-पंढरपूर-तुळाजापूर असं पायी उलटे चालत आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठा आरक्षण मिळावे व इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला, सर्व मराठा आमदार, खासदार, मंत्री, नेते यांना देवाने चांगली बुद्धी द्यावी म्हणून पायी उलटे चालत पुणे ते पंढरपूर ते तुळजापूर अनोख्या पद्धतीचे आंदोलन श्रीपती गुंड हे करित आहेत.



श्रीपती दगडोपंत गुंड याचं वय 49 असून, ते पुण्याच्या हवेली तालुक्यातील फुरसुंगीमधील रहिवाशी आहेत. समाजशास्त्र एम ए पर्यत शिक्षण घेतले आहे.

समाजातील अनेक अडचणी केवळ राजकारणी लोकांच्या इच्छाशक्तीच्या अभावी पूर्ण होत नाहीत. त्यामुळे त्यांना देवाने बुद्धी द्यावी म्हणून पायी उलटे चालत अनोख्या पद्धतीने आंदोलन करत पुणे येथून पंढरपूर व पुन्हा तुळजापूर येथील देवी देवतांना साकडे घालत आहेत.

पुणे ते हडपसर, सासवड, जेजूरी, लोणंद, फलटन, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, वाखरी, पंढरपूर मार्गे मोहोळ, बाळे सोलापूर मार्गे तुळजापूर जाणार आहेत.

श्रीपती गुंड यांच्या मागण्या काय?

  • मराठा आरक्षण

  • महिला अत्याचार थांबवावेत

  • एट्रॉसिटी कायदयात योग्य ती दुरूस्ती करण्यात यावी

  • रस्त्यावरील वाढते अपघात थांबावे

  • पोलिसावरील हल्ले थांबवावे

  • नोटबंदीनंतरचा नांगरिकांचा त्रास कमी व्हावा

  • निवडणुकातील गैरप्रकार टाळावे

  • पत्रकारांच्या मागण्या पूर्ण कराव्यात


श्रीपती गुंड हे अशा विविध मागण्या करत भगवा ध्वज हातात घेऊन, पायी उलटे चालण्याचे अनोखे आंदोलन सुरू आहे. 6 जानेवारीपासून रोज सकाळी साडेसहा वाजता राष्ट्रगीत गाऊन आंदोलनास सुरुवात होते व संध्याकाळी सहा वाजता प्रवासाच्या मुक्कामी पोहचतात आणि तेथील लोकांना या विषयायचे प्रबोधन करतात.